Fri, Jul 19, 2019 16:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 15 मिनिटांत कळणार पावसाची नेमकी माहिती! 

15 मिनिटांत कळणार पावसाची नेमकी माहिती! 

Published On: Jul 08 2018 1:44AM | Last Updated: Jul 08 2018 1:12AMमुंबई : विशेष प्रतिनिधी                                                    

राज्याच्या कानाकोपर्‍यात नेमक्या कोणत्या भागात पाऊस पडू शकेल याची माहिती केवळ 15-20  मिनिटांत लोकांपर्यंत पोहचणारे नवे तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम राज्याचा आपत्ती व्यवस्थापनाकडून केले जात आहे. वेधशाळेने दिलेल्या 24 ते 48 तासांच्या इशार्‍यावर  पाऊस पडणार असे आजवर अंदाज बांधून प्रशासन यंत्रणा तशी खबरदारी घेत असे. परंतु 15 ते 20 मिनिटात पडणार्‍या पावसाचे ढग नेमके कुठे जमा होणार याची इत्थंभूत माहिती मिळू शकणार असल्याने यापुढे शहरी भागाप्रमाणे  शेतकर्‍यांना नियोजन करणे शक्य होणार आहे.    

नैसर्गिक आपत्तीवर तातडीने उपाययोजना करता याव्यात यासाठी राज्याच्या 36 जिल्ह्याशी समन्वय साधून आपत्ती व्यवस्थापन कार्यात सरकारी पातळीवर तातडीने मदत उपलब्ध करून देण्यासाठी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभाग हा 24 तास कार्यरत असतो.  पावसाळ्यात नदीला महापूर, पूल, दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. त्यावेळी स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणा यांना मंत्रालयातून लागणारी मदत केली जाते. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांची ज्या ठिकाणी आवश्यकता असेल तेथे त्याना तातडीने पाचारण करण्याचे काम केले जाते. राज्याच्या ग्रामीण भागात शेतकरी पावससाकडे डोळे लावून बसलेले असतात.

आपल्याकडे वेधशाळेकडून जी माहिती येते त्या आधारावर हवामान कसे असेल तसेच पुढील 24 तासात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज  वेधशाळा व्यक्त करते. त्या भागात सतर्कतेचा इशारा दिला जातो. परंतु या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील ठराविक दोन तीन गावामध्ये काही मिनिटांमध्ये पावसाच्या सरी कोसळतील याची माहिती नव्या तंत्रज्ञानामुळे राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे उपलब्ध होणार आहेे                                                          
आतापर्यंत वेधशाळेच्या अहवालावर अवलंबून राहून जनजीवन सुरळीत राहावे यासाठी आवश्यक ती उपाययोजना केली जात असे. राज्याच्या कानाकोपर्‍यातील नेमक्या कोणत्या भागात किंवा ठराविक दोन तीन गावात पाऊस पडणार आहे याची माहिती संबंधित जिल्हा पातळीला या नव्या यंत्रणेमुळे मंत्रालयातून तातडीने कळविली जाईल. तसेच ठराविक गावातील लोकांपर्यंत ही माहिती पोहचविण्याची यंत्रणा उभी केली जाणार आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक  डॉ. दौलत देसाई यांनी दिली.