Thu, Apr 25, 2019 18:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पाऊस परतला!

पाऊस परतला!

Published On: Jun 24 2018 1:34AM | Last Updated: Jun 24 2018 1:13AMमुंबई/पुणे : प्रतिनिधी 

मुंबईत गेल्या आठवडाभरापासून दडी मारलेला पाऊस पुन्हा परतला आहे. शनिवारी पहाटेपासून शहर व उपनगरांत पडलेल्या पावसाच्या सरीमुळे उकाड्याने त्रस्त असलेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. काही भागात पावसाच्या जोरदार सरी पडल्यामुळे सखल भागात पाणी तुंबले होते. शहरातील वाहतूकही मंदावली होती. मध्य व पश्‍चिम रेल्वेच्या उपनगरीय गाड्याही 5 ते 10 मिनिटे विलंबाने धावत होत्या.

सुमारे चौदा दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सूनने संपूर्ण कोकण किनारपट्टीचा भाग व्यापला आहे. त्यापुढे सरकत गुजरातमधील  वलसाड, उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव, विदर्भातील अमरावतीपर्यंत दाखल झाला. मान्सून सक्रिय झाल्यामुळे कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. रविवारी (दि. 24) राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता असून कोकण, विदर्भातील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मुंबईकरांना गेल्या आठवड्यात पावसाने अक्षरश: झोडपून काढले होते. ठिकठिकाणी पाणी तुंबल्यामुळे शहराचे जनजिवनच विस्कळीत झाले होते. पण त्यानंतर पावसाने तब्बल आठवडाभर दांडी मारल्यामुळे शहरातील उकाड्यात वाढ झाली होती. पण शुक्रवारी पहाटेपासून पाऊस पुन्हा दाखल झाल्यामुळे मुंबईकर सुखावला आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत शहरात 31.06 मिमी, पूर्व उपनगरात 10.49 मिमी व पश्‍चिम उपनगरात 11.98 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. शहरातील सकल भागात पाणी साचले होते. पण पाण्याचा तातडीने निचरा झाल्यामुळे कुठेही वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली नाही. पश्‍चिम द्रुतगती महामार्गासह एस. व्ही. रोड. लिंक रोड, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, जे. जे. उड्डाणपूल, लालबाग, परळ, दादर, शिवाजीपार्क, धारावी, सायन, चेंबूर आदी भागातील रस्त्यावर सकाळी वाहतूक कोंडी झाली होती. उपनगरीय गाड्या विलंबाने धावत होत्या. येत्या 24 तासात शहरात पावसाच्या तुरळक व काही ठिकाणी मोठ्या सरी पडण्याची शक्यता वेधशाळने वर्तवली आहे.