Tue, Apr 23, 2019 18:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रेन अ‍ॅलर्ट!महामुंबई पाण्यात

रेन अ‍ॅलर्ट!महामुंबई पाण्यात

Published On: Jul 10 2018 1:17AM | Last Updated: Jul 10 2018 1:12AMमुंबर्ई/ठाणे/पालघर : पुढारी वृत्तसेवा

मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. गेल्या 24 तासात 200 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे रस्ते व मैदाने पाण्याखाली गेली. पदपथही पाण्याखाली गेल्याने लोकांचे अतोनात हाल झाले. विरार, नालासोपारा रेल्वे स्टेशन येथील रूळ व आजूबाजूचा परिसर पाण्याखाली गेल्यामुळे पश्‍चिम रेल्वेची उपनगरीय सेवा ठप्प पडली. त्यामुळे हजारो प्रवासी स्टेशनवर अडकून पडले. सकाळी कामावर निघालेले चाकरमानी दुपारनंतर कामावर पोहचले. तर काहींनी घरीच बसणे पसंत केले. शाळांना सकाळी सुटी जाहीर करण्यात आली. तर काही खाजगी कार्यालये बंद ठेवण्यात आली. बँकांच्या कामकाजावर पावसाचा मोठा परिणाम झाला. मुंबईकरांसह ठाणे, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली, मिरा-भाईंदर, वसई, विरार, नालासोपारा, पालघर आदी भागाला रविवार पहाटेपासून पावसाने अक्षरश: झोडपून काढले असून, संततधार सुरू असतानाच मुंबईसह कोकणात पुढील 24 तासात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

तुळसी तलाव भरला!

मुंबई : मुंबईला पाणी पुरवठा करणारा तुळसी तलाव सोमवारी सकाळी 7.30 वाजता ओसंडून वाहू लागला. 2017 मध्ये हा तलाव 14 ऑगस्ट रोजी ओसंडून वाहू लागला. यावेळी सुमारे 33 दिवस अगोदरच हा तलाव भरल्यामुळे पालिकेच्या जलअभियंता विभागाने आनंद व्यक्त केला. या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत 1680 मिमी पाऊस पडला आहे. तलावात 8 हजार 46 दशलक्ष लिटर्स पाणी साठवण्याची क्षमता असून मुंबई शहराला दररोज 60 ते 70 दशलक्ष लिटर्स इतका पाणी पुरवठा केला जातो. 

मरेच्या 37 लोकल रद्द!

मुंबई/ठाणे : प्रतिनिधी

सतत तीन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरावरील पाणी नाल्यामार्गे कळवा रेल्वे स्थानकात घुसले आणि सुमारे चार तास मध्य रेल्वे सेवा विस्कळीत झाली. ठाणे स्थानकातही रुळांवर पाणी साचले होते. दिवसभर लोकलचे वेळापत्रक कोलमडल्याने तब्बल 37 लोकल रद्द कराव्या लागल्या. धिम्या लोकल जलद मार्गावरून चालविण्यात आल्या, त्यामुळे कल्याणहून ठाण्याला पोहचण्यासाठी तब्बल एक तास लागत होता. दुपारी पाणी ओसरल्याने हळूहळू रेल्वेसेवा पूर्व पदावर येण्यास सुरुवात झाली. 

विरार व पालघर भागातून सकाळी कामावर निघालेले विरारसह नालासोपारा, वसई, भाईंदर, मिरारोड आदी स्टेशनवर अडकून पडले होते. त्यामुळे या स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. विरार येथून सकाळी 7 वाजता निघालेले प्रवासी दुपारी 11 ते 12 वाजता दक्षिण मुंबईतील आपल्या कार्यालयात पोहचले. तर काहींनी पायी चालत चालत घर गाठले. 

सोमवारी कामावर जाण्यासाठी रेल्वे स्थानकात पोहचणार्‍या प्रवाशांना उशिरा येणार्‍या लोकलचा नाहक त्रास सहन करावा लागला. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी स्थानकातील तोबा गर्दीमध्ये वाट करीत चाकरमानी मिळेल ती लोकल पकडण्यासाठी धावपळ करीत होते.  त्या चेंगराचेंगरीतही प्रवास करीत अनेकांनी कार्यालय गाठले. तर काही प्रवासांनी कळवा ते ठाणे आणि ठाणे ते मुलुंड असा पायी प्रवास करीत लोकल पकडली. 

कळवा रेल्वे स्थानकात नाल्याचे पाणी जमा झाल्याने लोकल सेवेवर परिणाम झाला. दुपारी 1 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास कळवा रेल्वे स्थानक, ठाणे रेल्वे स्थानक येथील पाणी ओसरण्यास सुरुवात झाल्याने लोकल सेवा पुन्हा पूर्वपदावर आली. मात्र, मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. दुसरीकडे सकाळी 10 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास मध्य रेल्वे मार्गावरील सँडहर्स्ट रोड स्थानकावरील फलाट क्रमांक एकच्या बाजूची सुरक्षा भिंत रेल्वे रुळावर कोसळली. त्यामुळे डाऊन मार्गावरील लोकल बंद ठेवण्यात आली होती. परंतु अवघ्या वीस मिनिटांतच कामगारांनी ढीग बाजूला केला आणि  लोकल सेवा सुरू झाली.

तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे सेवा खंडित

माटुंगा स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणार्‍या जलद लोकल ट्रेन्सचा खोळंबा झाला. याआधी सकाळी 11 च्या दरम्यान सँडहर्स्ट रोडवर भिंत कोसळल्यानेही वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. ज्यानंतर मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरची वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली.  तांत्रिक बिघाड दूर होईपर्यंत मध्य रेल्वेवर माटुंगा स्टेशनवर जलद लोकल्सचा खोळंबा झाला होता. मात्र तासाभराच्या अवधीत हा अडथळा दूर झाल्याने वाहतुक सुरळीत झाली.  

वातानुकूलित लोकलच्या चार सेवा रद्द

मुसळधार पावसामुळे वातानुकूलित लोकलच्या 12 फेर्‍यांपैकी एकूण चार फेर्‍या रद्द करण्यात आल्या. शिवाय मुंबईहून गुजरात, अहमदाबाद, दिल्ली, राजस्थानकडे जाणार्‍या अनेक लांब पल्ल्याच्या सेवा रद्द करण्यात आल्या. 

मुंबई-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द

मुंबईमध्ये दुपारी पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने मुंबई पुणे वाहतुकीवर देखील याचा परिणाम झाला. त्यामुळे दुपारी सुटणारी पुणे- मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली.शिवाय कोल्हापूर, सोलापूर, चेन्नई, बेंगलोरकडे जाणार्‍या लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला.

जेट एअरवेजची ऑफर 

जेट एअरवेजने ट्विट केलेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे मुंबईहून प्रवास करणारे फ्लाईट बदलू शकतात. फ्लाईट बदलण्यासाठी त्यांना कोणतीही पेनाल्टी लागणार नाही. दोन विमानांच्या दरांमध्ये जरी फरक असला तरीही तो आकारला गेला नाही. प्रवाशांना सोयीनुसार दुसरे तिकीट उपलब्ध करून देण्यात आली. 

सर्व महामार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

पावसामुळे रस्त्यांवर जागोजागी पाणी तुंबल्याने अनेक वाहने रस्त्यांवर बंद पडली. परिणामी वाहनांना बाजूला न घेता आल्यामुळे पूर्व दृतगती महामार्ग, मुंबई-पुणे महामार्ग, मुंबई-अहमदाबाद मार्गावर वाहनांच्या लांबच लांबा रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. 

विमानसेवेवर परिणाम

जोरदार पाऊस व धुके यामुळे विमान सेवेवर काही प्रमाणात परिणाम झाला. मुंबईतून दिल्ली, गोवा, चैन्नई आदी भागात जाणारे विमाने आज विलंबाने रवाना झाली. देशाबाहेर जाणार्‍या विमान सेवेवर परिणाम झाला होता, असे विमानतळ प्राधिकरणाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.  मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. रस्ते, रेल्वे सोबतच विमानसेवेवरही त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता आता जेट एअरवेजने खास सूट जाहीर केली आहे.