होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रेल्वे तिकीट तपासणीसाने वाचवले तरुणाचे प्राण

रेल्वे तिकीट तपासणीसाने वाचवले तरुणाचे प्राण

Published On: Feb 17 2018 2:07AM | Last Updated: Feb 17 2018 1:42AMडोंबिवली : वार्ताहर

कल्याण रेल्वे स्थानकात शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमाराला काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. एका मुख्य तिकीट तपासणीसाने जीवाची पर्वा न करता धावत्या एक्सप्रेसमधून पाय निसटल्याने प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये जाणार्‍या एका तरुणाचे प्राण वाचवत त्याला जीवदान दिले. काळजाचा ठोका चुकवणारा हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून या तिकीट निरीक्षकाचे कौतुक होत आहे. 

संदीप सोमाना (20) असे या तरुणाचे नाव असून, शशिकांत चव्हाण असे मुख्य तिकीट तपासणीसाचे नाव आहे. मुंबईहून सुटणारी लखनौ पुष्पक एक्सप्रेस सकाळी साडेनऊच्या सुमाराला कल्याण स्थानकात आली. त्यावेळी एक्सप्रेसच्या दरवाजात गर्दी असल्याने संदीपने कशीबशी ही गाडी पकडली. मात्र अचानक त्याचा तोल गेला व हात सटकल्याने तो प्लॅटफॉर्म व एक्सप्रेसच्या गॅपमध्ये सापडला. त्याच सुमारास मुख्य तिकीट निरीक्षक शशिकांत यांनी जीवाची पर्वा न करता संदीपला फलाटावरच रोखले. 

संदीप हा मुळचा गुजरातमधील भरूचचा राहणारा आहे. तर अंबरनाथच्या कानसई भागात राहणार्‍या तिकीट तपासणीस शशिकांत चव्हाण यांनी समयसुचकता दाखवत तरुणाचा जीव वाचवल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. अंबरनाथच्या संस्कृती कानसई प्रतिष्ठानतर्फे चव्हाण यांचा अपर्णा व कुणाला भोईर या दाम्पत्याच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.