Mon, Apr 22, 2019 15:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मान्सूनच्या स्वागतासाठी रेल्वे सज्ज

मान्सूनच्या स्वागतासाठी रेल्वे सज्ज

Published On: May 20 2018 1:43AM | Last Updated: May 20 2018 1:32AMमुंबई : प्रतिनिधी

मान्सूनचे आगमन यावर्षी लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्यात मुंबईकरांची जीवनवाहिनी ठप्प होऊ नये यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने कामांना धडाक्यात सुरुवात केली आहे. पावसाळ्यात रुळांवर पाणी साचून रेल्वेसेवा ठप्प होण्याची प्रसंग अनेकदा घडतात. मात्र यावर्षी असे प्रसंग उद्भवू नयेत यासाठी रेल्वे प्रशासाने कामाला सुरुवात केली आहे. रुळांमधील कचरा काढणे, नाल्याची साफसफाई, अनेक ठिकाणी वृक्षछाटणी या कामांना सुरुवात झाली.

मध्य रेल्वेने विविध नाल्यांच्या सफाईतून 80 घनमीटर गाळ काढला आहे. त्याचसोबत रेल्वे हद्दीतल्या 70 भूमिगत नाल्यांचीही सफाई जोरदार सुरू आहे. शिवाय मध्य आणि हार्बर मार्गावर पाणी साचणार्‍या 10 स्थानकांवर पाणी उपसा पंप बसवण्यात आले आहेत. मुंबई मनपानेही त्यांच्या हद्दीत 16 पंप बसवले आहेेत. विशेष म्हणजे पुराच्या पाण्याच्या पातळीचा इशारा देणारे इंडिकेटर बसवण्यात आलेत. हवामान खाते आणि आपत्कालीन विभाग यांच्याशी समन्वय साधण्यासाठी यंत्रणा बसवण्यात आली असून सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड न येण्यासाठी डिजिटल एक्सेल बसवण्यात आले आहेत. 

दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी दुरुस्ती करण्याचे काम वेगात करण्यात येत आहे. मुंबई-पुणे आणि मुंबई-नाशिक मार्गावर घाट सेक्शनमध्ये सर्वेक्षण करण्यात आले आहे. जिथे जिथे दरडी कोसळण्याच्या शक्यता आहे, अशा ठिकाणी अत्याधुनिक ड्रोन कॅमेर्‍यांचा वापर करण्यात आला आहे. मुंब्रा, कळवा, ठाणे, मुलुंड, करी रोड या गर्दीच्या स्थानकांवर पाऊस आल्यावर उभे राहण्यासाठी होल्डिंग एरिया तयार करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेनेही पावसाळापूर्व कामे करण्यावर भर दिला आहे. मरिन लाईन्स, मुंबई सेंट्रल, दादर, माटुंगा, मीरा रोड, माहीम, वांद्रे, अंधेरी, बोरिवली, नालासोपारा, विरार आदी सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता गृहीत धरून 100 पाणीउपसा पंप बसवण्यात आले आहेत. सिग्नल यंत्रणा, टेलिकम्युनिकेशन यंत्रणा, ओव्हरहेड वायर यांचीही दुरुस्ती करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेवरील 40 नाल्यांची सफाईही करण्यात आली आहे. रेल्वेने मान्सून पूर्व कामे तर जोरदार सुरू केली आहेत.