Sun, Mar 24, 2019 06:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रेल्वे अपघात रोखणारा रोबोट

रेल्वे अपघात रोखणारा रोबोट

Published On: Jun 16 2018 1:30AM | Last Updated: Jun 16 2018 1:12AMमुंबई : प्रतिनिधी

रेल्वे रुळाला तडे गेल्याच्या कारणामुळे अनेकदा रेल्वे अपघात झाले आहेत. अपघात रोखण्यासाठी रेल्वे रुळांच्या तड्यांवर देखरेख ठेवण्यासाठी स्वत: गँगमनला अनेकदा कष्ट घ्यावे लागत आहे. रुळाच्या तड्यांची पाहणी करताना अनेकदा गँगमन जखमी होतात, तसेच मृत्यूमुखीही पडतात. उपलब्ध आकडेवारीनुसार, वेगवेगळ्या अपघातांमध्ये वर्षाला जवळपास 400 गँगमनचा मृत्यू होतो. यामधील अनेकांचा ट्रेनने धडक दिल्याने मृत्यू झालेला असतो. मात्र आयआयटी मद्रासच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रोबोटमुळे अनेक कामगारांचा जीव वाचणार आहे, तसेच प्रवासीही सुरक्षित प्रवास करु शकणार आहेत.

आयआयटी मद्रासच्या विद्यार्थ्यांनी एक रोबोट तयार केला आहे जो रेल्वे अपघात रोखण्यात मदत करण्यात येणार आहे. हा रोबोट रेल्वे ट्रॅकसोबत जोडण्यात येईल. हा रोबोट सेन्सरच्या सहाय्याने 2 सेंमीपर्यंतच्या तड्याची माहिती देऊ शकतो. तसेच हा रोबोट रिअल टाइम डेटा देणार आहे. या रोबोटमुळे गँगमनला दरवेळी ट्रॅकवर उतरुन तडे गेले आहेत की नाही याची पाहणी करावी लागणार नाही.

1.5 फूट उंचीच्या या रोबोटला सहा चाके असतील. हा रोबोट पुढे आणि मागे अशा दोन्ही बाजूने प्रवास करु शकतो. डेटा गोळा करण्यासाठी रोबोटमध्ये अल्ट्रासॉनिक सेन्सर असणार आहे. रोबोटमधील मायक्रोचिपमध्ये हा डेटा गोळा होईल. जर रुळाला तडा असेल तर मायक्रोचिप लोकेशन आणि अलर्ट पाठवणार. रोबोट वजनाला अत्यंत हलका असणार असून, ट्रेन रुळावरुन धावत असतानाही तो हालचाल करु शकतो.