Sat, Sep 22, 2018 18:28



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बुलेट ट्रेन नको, सुरक्षित प्रवास हवाय!

बुलेट ट्रेन नको, सुरक्षित प्रवास हवाय!

Published On: Jul 04 2018 2:16AM | Last Updated: Jul 04 2018 1:47AM



मुंबई : प्रतिनिधी

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेवरून काँग्रेस-राष्ट्रवादीने रेल्वे प्रशासनाबरोबरच केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे. मुंबईकरांना बुलेट ट्रेन नको तर सुरक्षित प्रवास हवाय, असा संताप काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केला. तर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी अंधेरी येथील पुलाच्या दुर्घटनेवरून राजकारण नको, तर रेल्वे सुधारणेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोसळणारे ब्रिज, रस्त्यांवर पूर, अडकलेले नागरिक, स्थानिक प्रशासनच कोसळलंय, सुरक्षित राहा, असे ट्विट करत मुंबईकरांबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे.दरम्यान काँग्रेस प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी अंधेरी रेल्वे पूल दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, मुंबईकरांना बुलेट ट्रेनची  नाही सुरक्षित लोकल प्रवासाची गरज असल्याचे म्हटले आहे.

मुंबई महापालिका या पुलाच्या देखभालीचा खर्च रेल्वेला वेळोवेळी देत आहे, असे महापौरांनी सांगितले. मात्र दिलेला निधी योग्य कारणासाठी खर्च होतो की नाही हे पाहण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेची आहे. महापालिकेने ती जबाबदारी योग्य रितीने पार पाडली नाही, असे चव्हाण यांनी म्हटले आहे. 

सरकार स्मार्ट सिटी आणि बुलेट ट्रेनच्या घोषणा करत आहे. मुख्यमंत्री परदेशात जाऊन हायपर लूपसारख्या सेवांची चाचपणी करत आहेत, मात्र मुंबई शहराची लाईफलाईन असलेल्या अत्यंत उपयुक्त अशा उपनगरीय रेल्वे सेवेकडे मात्र दुर्लक्ष केले जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली आहे. 

हा सरकारचा निष्काळजीपणा - विखे-पाटील 

एल्फिन्स्टन चेंगराचेंगरी झाल्यावर सर्व पुलांचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचा दावा सरकारने केला होता. तरीही अंधेरीत पादचारी पूल रेल्वे रुळांवर कोसळतो, ही बाब चीड आणणारी आहे. सरकारला मुंबईकरांच्या जीवाची अजिबात काळजी नाही, हे यातून स्पष्ट होत आहे. भाजप आणि शिवसेनेने पुलाची जबाबदारी एकमेकांवर ढकलू नये, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले आहे. 

मुंबईतून कर घेतात, पण सुविधा नाही - धनंजय मुंडे 

केंद्राला मुंबईतून लाखो कोटी रुपयांचा कर शासनाला मिळतो पण मुंबईकरांच्या सुविधेसाठी आवश्यक मूलभूत सुविधांवर त्याचा खर्च मात्र केला जात नाही. उपनगरीय रेल्वेत अपघातांच्या घटना झाल्यानंतर तात्पुरती मलमपट्टी केली जाते. त्यापेक्षा एकदाच उपनगरीय रेल्वेचा सर्व्हे करून कोणकोणत्या सुविधा अपेक्षित आहेत, याचा आढावा घेऊन तरतूद करण्यात यावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.