होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बोईसर स्थानकात संतप्त प्रवाशांचा रेलरोको 

बोईसर स्थानकात संतप्त प्रवाशांचा रेलरोको 

Published On: Jan 30 2018 2:17AM | Last Updated: Jan 30 2018 1:28AMमनोर : वार्ताहर

बोईसर रेल्वे स्थानकात ऐन गर्दीच्या वेळी आलेल्या भूज वांद्रे 22959 सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये मासिक सिझन तिकीट(एमएसटी) आणि आरक्षित तिकीट धारक यांच्यात वाद झाल्याने जोरदार धुमश्चक्री उडाली. या वादाला वैतागलेल्या काही संतप्त प्रवाशांनी रेल रोको केल्यामुळे एक्सप्रेस गाड्या आणि लोकलचे वेळापत्रक कोलमडले.परिणामी पश्चिम रेल्वेच्या हजारो प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा   लागला.

आज सकाळी एमएसटीधारकांच्या एका गटाने 22959  अप-भूज वांद्रे सुपरफास्ट एस्कप्रेसने वापी स्थानकात प्रवेश केला. यावेळी प्रवाशांनी आरक्षित तिकीटे न घेता आरक्षित जागांवर कब्जा करण्यास सुरुवात केली असता जागेवरून दोन गटात वाद झाला. हा वाद इतका विपोकाला गेला की शेवटी वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. अन्य काही प्रवासीही या भांडणात सहभागी झाले. बघता बघता प्रकरण हातघाईवर आले आणि दोन गटात जोरदार धुमश्चक्री सुरु झाली. संपूर्ण डब्यात हा प्रकार सुरू होता. त्यानंतर वापी स्थानकाहून सुटलेली ही गाडी बोईसर स्थानकात आल्यावर काही संतप्त प्रवाशांनी चेन खेचून खाली उतरून वांद्रे-भुज सुपरफास्ट एक्स्प्रेस रोखून धरली व जोपर्यंत जनरल तसेच पासधारक प्रवासी उतरवत नाहीत तोपर्यंत गाडी सोडणार नसल्याचा पवित्रा घेतला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे बोईसर रेल्वे स्थानकात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले  होते.

अखेर बोईसर पोलीस व  रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही गटांना पांगवले. त्यामुळे वांद्रे-भुज एक्सप्रेस सुरू झाली. मात्र, प्रवाशांनी केलेल्या या आंदोलनामुळे एक्सप्रेस गाड्या आणि लोकल दीड ते दोन तासापर्यंत रखडल्या. नंतर पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्ववत सुरू झाली. या घटनेमुळे इतर प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. भांडण करणार्‍या एक पुरुष आणि एका महिला प्रवाशाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.