होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लोकलची अस्मानी कोंडी

लोकलची अस्मानी कोंडी

Published On: Jul 11 2018 1:37AM | Last Updated: Jul 11 2018 1:04AMमुंबई/ठाणे : पुढारी वृत्तसेवा

वसई-विरार, पालघर परिसरात तब्बल 11 ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याने पश्‍चिम रेल्वेचा, तर ठाणे, कळवा आणि सायन येथे पाणी साचल्याने मध्ये रेल्वेसेवेचा मोठा खोळंबा झाला. मध्य रेल्वेवर शंभर तर पश्चिम रेल्वेवर एकशे सत्तावीस फेर्‍या रद्द करण्यात आल्या. पन्नासहून अधिक फेर्‍या उशिराने धावत होत्या. ठाणेकरांना मुंबईकडे येण्यासाठी दुपारनंतर तब्बल चार तास वाट पहावी लागली.

मंगळवारी सकाळी रुळावर मोठ्या प्रमाणात साचलेल्या पाण्यामुळे वसई-विरार लोकल सेवा तात्काळ बंद करण्यात आली व वीजपुरवठाही खंडित करण्यात आला.  नालासोपारा येथे सकाळी रेल्वे रुळांवरील पाण्याची पातळी 200 मिमी. होती ती संततधार कोसळणार्‍या मुसळधार पावसाने थेट 460 मिमी.वर पोहचली आणि या मार्गावरून लोकल धावणे अशक्य झाले. परिणामी, नालासोपार्‍याच्या उत्तरेकडील स्थानकांवर ठिकठिकाणी 20 लोकल जागीच थांबवण्यात आल्या. डहाणू रोड, भोलवड, संजन, वलसाड, वापी, पालघर आदी स्थानकांवरून या गाड्या माघारी बोलवण्यात आल्या.

सहा डाऊन आणि सात अप लांब पल्ल्याच्या गाड्या पूर्णत: रद्द करण्यात आल्या. त्यात मुंबई - अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेस ही गाडी नालासोपार्‍यापर्यंत पोहचल्यानंतर थांबवण्यात आली आणि ती पुन्हा मुंबई सेंट्रलला बोलवण्यात आली. मुंबई - दिल्‍ली राजधानी एक्स्प्रेस रात्री 8 वाजता निघणार होती. एकूण सहा रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले.

मुंबई - पुणे रेल्वेला ब्रेक

सतत कोसळणारा पाऊस, नदी-नाले ओलांडून शेतामध्ये घुसलेला पूर आणि रूळांवर चढलेले पाणी यामुळे मुंबईहून पुण्याला जाणार्‍या गाड्यांचाही खोळंबा झाला. 10 आणि 11 जुलैच्या पाच मुंबई-पुणे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्यांची वाहतूक दौड-मनमाड मार्गाने वळविण्यात आली आहे. 

11026 पुणे-भुसावळ या ट्रेनच्या मार्गात बदल करून ती दौंड-मनमाडमार्गे वळवण्यात आली. 11025/11026 भुसावळ-पुणे-भुसावळ ट्रेनही मनमाड-दौंड मार्गे वळवण्यात आली आहे. पुणे-हजरत निजामुद्दीन दुरांतो एक्स्प्रेस ही दौंड-मनमाड-खांडवा-भोपाळ मार्गे वळवण्यात आली आहे. तुतिकोरीन-ओखा विवेक एक्स्प्रेसच्या मार्गात बदल करून ती इगतपुरी-मनमाड-जळगावमार्गे वळवण्यात आली आहे. यशवंतपूर-बारमेर वातानुकूलित एक्स्प्रेसही इगतपुरी-भुसावळ- खांडवा- भोपाळ- रतलाम- बेराच मार्गे धावणार आहे.

पश्‍चिम रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळेत बदल

जोरदार पावसाचा फटका पश्‍चिम रेल्वेलाही बसला. या मार्गावरील24 मेल/एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या. अहमदाबाद मुंबई सेंट्रल डबल डेकर, बिकानेर वांद्रे टर्मिनस,  अहमदाबाद मुंबई सेंट्रल कर्णावती एक्स्प्रेस या गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आले.

रद्द झालेल्या एक्स्प्रेस

मुंबई सेंट्रल-इंदूर अवंतिका एक्स्प्रेस, इंदूर-मुंबई सेंट्रल अवंतिका एक्स्प्रेस, मुंबई सेंट्रल- ओखा सौराष्ट्र मेल एक्स्प्रेस,  ओखा-मुंबई सेट्रल सौराष्ट्र एक्स्प्रेस, मुंबई सेंट्रल- वडोदरा एक्स्प्रेस, वडोदरा- मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस, राजकोट-मुंबई सेंट्रल दुरंतो एक्स्प्रेस, मुंबई सेंट्रल - राजकोट दुरंतो एक्स्प्रेस, हजरत निजामुद्दीन - मुंबई सेंट्रल ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेस, फिरोजपूर कॅन्टोन्मेंट-मुंबई सेंट्रल, भावनगर टर्मिनस- वांद्रे, जयपूर - वांद्रे टर्मिनस आरवली एक्स्प्रेस, जामनगर-वांद्रे टर्मिनस सौराष्ट्र जनता एक्स्प्रेस, मुंबई सेट्रल- जयपूर, वांद्रे टर्मिनस - अहमदाबाद, अहमदाबाद- वांद्रे टर्मिनस, जयपूर - मुंबई सेंट्रल, ऑगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेस, सुरता वांद्रे या गाड्या रद्द करण्यात आल्या.  मुंबई सेंट्रल-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस आपल्या निर्धारित वेळेपेक्षा तीन तास उशीराने म्हणजेच रात्री 20.00 वाजता सोडण्यात आली. बांद्रा-अमृतसर पश्‍चिम एक्सप्रेस ही गाडी आठ तास उशीराने रात्री 20.00 वाजता सोडण्यात आली. 12903 बांद्रा टर्मिनस-अमृतसर गोल्डन टेंपल ही गाडी पहाटे 05.10 वाजता सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.