Fri, Jul 19, 2019 15:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 12 इंच पाण्यातही चालणार रेल्वे इंजिन

12 इंच पाण्यातही चालणार रेल्वे इंजिन

Published On: Jun 14 2018 1:34AM | Last Updated: Jun 14 2018 1:32AMमुंबई : प्रतिनिधी

मध्य रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेने लवकरच नवे वॉटरप्रूफ इंजिन चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे इंजिन रेल्वे रुळावर भरलेल्या 12 इंचाच्या पाण्यातही चालू शकणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात लोकल खोळंबा होण्याची शक्यता घटण्याची शक्यता आहे. 
सर्वांना हवाहवासा वाटणारा पाऊस मध्य रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाशांना मात्र नकोसा वाटतो. जरासा जरी पाऊस झाला तरी या मार्गावरील लोकल सेवा उशिराने धावतात. पावसाळ्यात रेल्वे रुळांवर

पाणी तुंबल्यामुळे रेल्वेचा वेग मंदावतो. परिणामी हजारो चाकरमान्यांचे, प्रवाशांचे कामावर येताना किंवा घरी जाताना मोठ्या प्रमाणात हाल होतात. मात्र वॉटरफ्रूफ इंजिनचा वापर केल्यामुळे रुळावर पाणी साठले असतानादेखील वाहतूक सुरू राहणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. पावसाळ्यात नेहमीच लोकलचा खोळंबा होत असतो, मात्र यावर्षी पावसाळ्यात प्रवाशांना सुखकर प्रवासाचा अनुभव या वॉटरफ्रूफ इंजिनमुळे घेता येणार आहे. 

सध्या मध्य रेल्वे मार्गावर कार्यरत असलेले वॉटरफ्रूफ इंजिन हे केवळ 4 इंच पाण्यात चालण्याच्या क्षमतेचे आहे. 4 इंचापेक्षा जास्त पाणी रुळावर जमा झाल्यास हे पाणी इंजिनच्या खालून ट्रॅ़क्शन मोटरमध्ये जाते. ज्यामुळे इंजिनमध्ये बिघाड निर्माण होतो, असे रेल्वेच्या अधिकार्‍यांनी सांगितले. या इंजिनमध्ये एक खास प्रकारचे सेन्सर बसवण्यात आले आहे. या सेन्सरमुळे मोटरच्या तापमानात नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. या इंजिनची चाचणी पूर्ण झाली असून सध्या ते कुर्ला लोकोमोटिव्ह शेडमध्ये आहे.