Sun, May 31, 2020 18:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रेल्वेचा त्रास होत असेल तर बसने प्रवास करा

रेल्वेचा त्रास होत असेल तर बसने प्रवास करा

Published On: Jan 21 2018 2:50AM | Last Updated: Jan 21 2018 12:43AMमुंबई : अभिषेक कांबळे

ट्रेन लेट होऊनही उद्घोषणा केली जात नसल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या रेल्वे प्रवाशांना ठाणे स्थानकातील स्थानक उप व्यवस्थापक रवी नांदुरकर यांनी रेल्वे प्रवासाचा त्रास होत असेल, तर तुम्ही बसने प्रवास करा असा सल्ला देण्याची मुजोरी केली. यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त करून त्या मुजोर व्यवस्थापकाची विभागीय उप व्यवस्थापक (डीआरएम) यांच्याकडे तक्रार करण्याची तयारी चालवली आहे.

सध्या डाऊन ट्रेनच्या विलंबामुळे उशिराने जात असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. शुक्रवारी रात्री (19 जानेवारी) रोजी डाऊन कल्याण, खोपोली स्लो ट्रेन लेट होत्या. मात्र कोणत्याही प्रकारची उद्घोषणा झाली नाही. प्रवाशांनी ठाणे स्थानकातील 2. नं प्लॅट फॉर्मवरील स्थानक उप व्यवस्थापकांचे कार्यालय गाठून विचारणा केली. यावेळी कल्याण आणि खोपोली लोकलच्या प्रवाशांनी तेथे कर्तव्यावर असलेले उप व्यवस्थापक रवी नांदुरकर यांना धारेवर धरले. यानंतर उद्घोषणा झाली. मात्र, 11 वाजून 19 मिनिटांची कल्याण आणि 11 वाजून 23 मिनिटांच्या खोपोली ट्रेनऐवजी थेट 11 वाजून 29 मिनिटांची अंबरनाथ गाडीची उद्घोषणा होऊन अंबरनाथ गाडी आली. 

खोपोली गाडीसंदर्भात विचारण्यासाठी खोपोली ट्रेनचे प्रवासी तेथेच थांबले. त्यांनी नांदुरकर यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. यावेळी नांदुरकर यांनी तुम्हाला कामावर जायला उशिर होऊन लेटमार्क लागत असेल, तर तुम्ही बसने प्रवास करा असा अजब सल्ला दिला. 

नांदुरकर यांच्या मुजोरीविरोधात एका प्रवाशाने शनिवारी (20 जानेवारी) ठाणे स्थानक प्रबंधकांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली. तसेच मुजोर रवी नांदुरकर यांची विभागीय उप व्यवस्थापक (डीआरएम) यांच्याकडे तक्रार करण्याची तयारी चालवली आहे.