Mon, May 27, 2019 01:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवभक्तांच्या मदतीने रायगड संवर्धन : संभाजीराजे(Video)

शिवभक्तांच्या मदतीने रायगड संवर्धन : संभाजीराजे(Video)

Published On: Feb 27 2018 9:15PM | Last Updated: Feb 27 2018 9:06PMमहाड : श्रीकृष्ण द. बाळ- इलियास ढोकळे

हिंदवी स्वराज्याची राजधानी असणारे किल्ले रायगड हे तमाम शिवभक्तांचे प्रेरणास्त्रोत असून या शिवभक्तांच्या सहकार्यातूनच रायगड संवर्धनाची कामे पूर्ण करण्यची ग्वाही रायगड प्राधिकरण समितीचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. आज पाचाड येथे झालेल्या बैठकीप्रसंगी त्यांनी राष्ट्रमाता जिजाऊंच्या नावाने महिलांसाठी करावयाच्या विविध योजनांकरिता तसेच जिजाऊ स्मारकासाठी आपल्या खासदार निधीतून १ कोटी रुपये देण्याची घोषणा केली. याचबरोबर रायगड परिसरातील ग्रामस्थांच्या विविध विकासात्मक कामांकरिता समन्वय समितीची स्थापना करणार असल्याचेही संभाजीराजे यांनी जाहीर केले. 

याप्रसंगी माजी आमदार माणिक जगताप यांनी सांगितले की, किल्ले रायगड संवर्धनासाठी ६ हजार कोटी रुपयांची गरज असून, ६०० कोटींची तरतूद राज्य शासनाने केल्यामुळे पुढील कामांसाठी केंद्रशासनाने निधी द्यावा, अशी मागणी केली आहे. तर रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रायगड परिसरातील ग्रामस्थांनी सुचविलेल्या जलयुक्त शिवार योजनांची अंमलबजावणी आपण करणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, २१ गाव कृती समितीच्या माध्यमातून खासदार संभाजी राजे छत्रपती यांना दिलेल्या लेखी निवेदनात रायगड संवर्धनाचा आराखडा रद्द करून तो नव्याने करण्याची मागणी केली आहे. 

रायगड प्राधिकरणाच्या स्थापणेनंतर गेल्या महिन्यात रायगड परीसरातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन कृती समितीची स्थापना केली होती. या संदर्भात प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे यांनी आज पाचाड धर्मशाळेमध्ये संबंधित गावातील सरपंच, लोकप्रतिनिधी, विविध संघटनांचे प्रमुख, कृती समितीचे सदस्य, प्रशासकीय अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते. या प्रसंगी व्यासपीठावर खा. संभाजीराजे यांसह जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, माजी आमदार माणिकराव जगताप, प्राधिकरण समितीचे सदस्य पांडुरंग बलकवडे, सुधीर थोरात, सनी ताटले, भगवान चिले, राम यादव, फत्तेसिंह सावंत, निवासी जिल्हाधिकारी  श्री काळभोर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गवळी तहसीलदार चंद्रसेन पवार आदी मान्यवर उपस्थित होते. 

उपस्थित ग्रामस्थांनी व लोकप्रतीनिधींनी व्यक्त केलेल्या मागण्यांना उत्तर देताना खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी किल्ले रायगड हे सर्व शिवभक्तांचे, स्फ्रुती, प्रेरणास्थान असून या संवर्धनाच्या माध्यमातून रायगडसह अन्य ५ किल्ल्यांचे संवर्धन केले जाणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, किल्ल्यांच्या दुरुस्तीकामी पैसा खर्च न करता रयतेच्या कल्याणासाठी या निधीचा वापर करणार असल्याचे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.