होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नीरव मोदीचा अलिबागमधील आलिशान बंगला आणि कार सील

नीरव मोदीचा अलिबागमधील आलिशान बंगला आणि कार सील

Published On: Feb 21 2018 1:47AM | Last Updated: Feb 21 2018 1:47AMरायगड : प्रतिनिधी

पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी याच्या अलिबाग तालुक्यातील किहीम येथील मोदीवाडी नावाच्या फार्म हाऊसवर मंगळवारी सीबीआयने छापा टाकला. बंगल्यात कारवाई करण्यासाठी आलेल्या टीमने तातडीने चौकशी केली. फार्महाऊसवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांचीही यावेळी चौकशी करण्यात आली. त्याचबरोबर या फार्महाऊसवर असणार्‍या नीरव मोदींच्या मालमत्तेची नोंद करून  किहीम येथील आलिशान बंगला आणि दोन कार सीबीआयने सील केल्या आहेत.


नीरव मोदी याची अलिबाग तालुक्यातील किहीम समुद्र किनार्‍यावर पावणे दोन एकर मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. या जागेत एक आलिशान बंगला, स्विमिंग पूल, आंबा, नारळाची झाडे आहेत. या मालमत्तेची बाजारभावानुसार अंदाजित किंमत पावणे चार कोटीच्या घरात आहे. 
निरव मोदी याचा या जागेत 63.11 गुंठे हिस्सा तर सिराज मोहमद भोलुभोय 7.11 गुंठे जमिनीवर हिस्सा आहे. 1985 साली पावणेचार गुंठा जागेवर शेतघर बांधलेले असले तरी तो एक आलिशान बंगलाच आहे.

बंगल्यात एक स्विमिंग पुलही बांधण्यात आला आहे. त्याचबरोबर या जागेत आंबा व नारळ माडाची झाडेही आहेत. या सर्व मालमत्तेची अंदाजित रक्कम पावणेचार कोटीच्या घरात आहे. अलिबाग तालुक्यातील किहीम परिसरात उभारलेल्या अनधिकृत इमल्यांमध्ये नीरव  मोदीचा बंगला किहीम किनार्‍यालगत उभा आहे. सीआरझेडचे उल्लंघन केल्याने प्रशासनाने नीरव  मोदीला कायदा उल्लंघन केल्या बाबत नोटीस देखील बजावल्या आहेत. किहीम ग्रामपंचायत हद्दीत हा बंगला असल्याने या बंगल्याला ग्रामपंचायतीची घरपट्टी आहे.

नीरव दीपक मोदी या नावाने हा बंगला ग्रामपंचायतीत नोंद झालेला आहे. किहीम ग्रामपंचायतीत निरव मोदीच्या नावाने चार मालमत्ता आहेत. या चार घरांच्या घरपट्टी  पोटी  किहीम ग्रामपंचायतीला दरवर्षी सुमारे 2 लाख  5 हजार रुपयांचा महसूल मिळत होता.

पीएनबीच्या दहा अधिकार्‍यांची चौकशी

पीएनबी घोटाळाप्रकरणी सीबीआयने तपासाची चक्रे गतिमान केली असून, पीएनबीच्या 10 वरिष्ठ अधिकार्‍यांची चौकशी केली. सक्‍त वसुली संचालनालय आणि सीबीआयने पीएनबी घोटाळाप्रकरणी तपासाची व्याप्‍ती वाढविली आहे. आतापर्यंत दोन्ही तपास यंत्रणांनी संयुक्‍तपणे 50 ठिकाणी छापे टाकले आहेत. लेटर ऑफ अंडरटेकिंगच्या आधारे हिरे व्यापारी नीरव मोदी याने घोटाळा केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सीबीआयने पीएनबीच्या दहा वरिष्ठ अधिकार्‍यांची मंगळवारी चौकशी केली. मोदी कुटुंबीयांशी संबंधित 29 मालमत्ता आणि 105 बँक खाती प्राप्‍तिकर खात्याने गोठवली असून, त्याच्या घर व कार्यालयावरही छापा टाकण्यात आला.  

नोटाबंदीच्या काळात हिरे व्यापारी नीरव मोदीकडून रोखीने हिरे खरेदी करणारे देशातील 50 ख्यातनाम उद्योजक, बॉलीवूडमधील कलाकार आणि सेलिब्रिटी आता आयकर विभागाच्या ‘रडार’वर आहेत. नीरव मोदीच्या कार्यालयांवरील छाप्यामुळे ही बाब समोर आली असून, हे सर्वजण आता चौकशीच्या फेर्‍यात अडकण्याची चिन्हे आहेत.आयकर विभागाने नीरव मोदी आणि त्याचा भागीदार मेहुल चोक्सी यांच्या गीतांजली जेम्स समूहातील 20 ठिकाणी छापे टाकले.