Sat, Jul 20, 2019 23:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ग्रॅन्ट रोडला धाड पडताच तिसर्‍या मजल्यावरून उडी घेतल्याने दोन वेश्यांचा मृत्यू

ग्रॅन्ट रोडला धाड पडताच तिसर्‍या मजल्यावरून उडी घेतल्याने दोन वेश्यांचा मृत्यू

Published On: Apr 12 2018 1:42AM | Last Updated: Apr 12 2018 1:39AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबईच्या ग्रॅन्ट रोड परिसरातील एका इमारतीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर छापा टाकण्यासाठी पोलीस गेले असताना झालेल्या पळापळीत इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरून पडून दोन वारांगणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी रात्री घडली. सलमा ऊर्फ माया शेेख (25) आणि अंजिरा उर्फ सुमन शेख (45) अशी या दोघींची नावे असून शवविच्छेदन अहवालानंतरच त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. 

ग्रॅन्ट रोड पूर्वेकडील ओम निवास इमारतीमध्ये अवैधरित्या वेेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती डी. बी. मार्ग पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तपासणीसाठी मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास पोलिसांचे एक पथक या इमारतीमध्ये घुसले. पोलिसांची रेड पडल्याचे समजताच इमारतीमध्ये राहात असलेल्या अंजिरा आणि सलमा यांनी इमारतीच्या मागच्या बाजूला असलेल्या खिडकीला दोरी बांधून ड्रेनेज पाईपच्या आधाराने खाली उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

सलमा दोरीवरून खाली उतरू लागली. तिच्यापाठोपाठ अंजिरानेसुद्धा खाली उतरण्यासाठी पाय खिडकीतून बाहेर टाकला. मात्र अंजिराचा दोरीला धरलेला हात सुटला आणि ती सलमाच्या अंगावर पडली. त्यानंतर दोघीही खाली पडल्या. तोपर्यंत पोलीस तिसर्‍या मजल्यावर पोहोचले होते. त्यांनी इमारतीच्या मागच्या बाजूच्या खिडकीतून वाकून बघितले असता दोघी जणी जखमी अवस्थेत रस्त्यावर पडल्या होत्या. या घटनेमुळे ग्रॅन्ट रोड परिसरात खळबळ उडाली.पोलिसांनी तात्काळ इमारतीच्या मागच्या बाजूला धाव घेत जखमी अवस्थेतील दोघींनाही उपचारांसाठी जे. जे. रुग्णालयात दाखल केले.

मात्र अंजीराचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. तर मध्यरात्रीच्या सुमारास उपचार सुरू असताना सलमाचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. अखेर याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करत डी. बी. मार्ग पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दोन्ही मृत महिलांच्या शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. असे एका अधिकार्‍याने बोलताना सांगितले. मूळच्या पश्‍चिम बंगालच्या रहिवाशी असलेल्या सलमा आणि अंजीरा अनेक महिन्यांपासून या इमारतीमध्ये राहात होत्या. वेश्यव्यवसायाला विरोध करत स्थानिक नागरीकांनी कारवाईची मागणी केली होती. तसेच पोलिसांनाही वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहीती मिळाल्याने तपासणीसाठी पोलीस इमारतीमध्ये घुसले आणि ही घटना घडली. दोघींच्या मृत्यूबाबत त्यांच्या कुटूंबियांना माहिती देण्यात आली असून आर्थिक परिस्थीती बेताची असल्याचे कारण देत कुटूंबियांनी मृतदेह ताब्यात घेण्यासाठी मुंबईत येण्यास नकार दिल्याची माहिती पोलिसांकडून मिळते. 

Tags : mumbai news, Grant Road, Raid, Two prostitutes, die, jumping,  third floor,