Mon, Mar 25, 2019 13:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सरकार श्रीमंत लोकांसाठी काम करतं : राहुल गांधी

मोदी सरकार श्रीमंतांचे खिसे भरतंय : राहुल गांधी

Published On: Jun 13 2018 9:28AM | Last Updated: Jun 13 2018 12:45PMमुंबई : प्रतिनिधी

देशातील सर्वात श्रीमंत लोकांसाठीच सरकार काम करत असून त्यांना सामान्य जनतेशी काही देणंघेणं नाही. श्रीमंतांच लाखो करोडो रुपयांचं कर्ज माफ केले जात आहे, तर दुसरीकडे पेट्रोल-डिझेलची दरवाढ करून गरीब लोकांच्या खिशातुन पैसा काढून तो श्रीमंतांच्या खिशात टाकण्याचं काम मोदी सरकार करत असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना केली.

मनमोहन सिंह सरकारच्या काळात पेट्रोलचे दर 140 डॉलर प्रति बॅरल होते, आज तेच दर 70 डॉलर प्रति बॅरल आहेत. दर कोसळूनही जनतेला त्याचा फायदा होताना दिसत नाही.

दररोज पेट्रोल का महागतंय?  हा पैसा कुठं जातोय? गरिबाचे पैसे घेऊन डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या मद्यमातून 15-20 श्रीमंताचे खिसे भरण्याच काम केल जात आहेत. त्यामुळेच आम्ही पेट्रोल-डिझेल जीएस्टीच्या कक्षेत आणण्याची मागणी केली, मात्र पंतप्रधानांना त्यात इंटरेस्ट नसल्याचे राहुल गांधी म्हणाले.

नोटबंदीचा निर्णय घेऊन मुंबईवर आक्रमण केलं, त्यात मुंबईतील छोटेछोटे व्यवसायिक दुकानदार भरडले गेले, लेदर, कापड व्यवसायिकांच नुकसान झालं. गब्बरसिंह टॅक्स लागू केला. त्यामुळे सर्व देश नाराज आहे. छोटा व्यापारी दु:खी आहे. त्यासाठीच आमची लढाई सुरु  असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.

मंगळवारी मुंबई दौऱ्यावर आलेल्या राहुल गांधी यांनी बुधवारी मुंबईतुन जाण्यापूर्वी अवघ्या अडीच मिनिटांच्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. 

राहुल गांधी कालपासून मुंबई दौऱ्यावर आहेत.  महात्मा गांधी यांच्या हत्येत आरएसएसचा सहभाग असल्याचे वक्तव्य राहुल  गांधी यांनी एका प्रचारसभेत केले होते. त्याची सुनावणी काल भिवंडी कोर्टात झाली. कोर्टातील कामकाजानंतर त्यांनी मुंबईतील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 2019 मध्ये  मुंबई, महाराष्ट्र, संपूर्ण देशात काँग्रेस आणि विरोधक भाजपाला निवडणुकीत हरविल्याशिवाय राहणार नाहीत, असा आत्मविश्‍वास व्यक्त करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आगामी निवडणूक प्रचाराचे रणशिंग मुंबईत फुंकले. 

काल मुंबईत दाखल झालेल्या राहुल गांधी यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेनंतर ते चंद्रपूरला रवाना झाले आहेत. तेथे दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत.