Wed, Jun 26, 2019 17:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पोलीस ठाण्यात डोके आपटून घेत काचा फोडल्या

पोलीस ठाण्यात डोके आपटून घेत काचा फोडल्या

Published On: Apr 10 2018 1:37AM | Last Updated: Apr 10 2018 1:03AMमुंबई : प्रतिनिधी

दोघांमध्ये वाद सुरू असल्याच्या नियंत्रण कक्षाला आलेल्या कॉलवरुन कारवाई करत पवई पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणलेल्या 28 वर्षीय माथाडी कामगाराने पोलिसांसमोरील काचेचे टेबल आणि खिडक्यांवर डोके आपटून घेत गोंधळ घातल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली. प्रकाश छोटूलाल यादव असे या माथेफिरु माथाडी कामगाराचे नाव असून पोलिसांनी सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री परिसरात गस्त सुरू असताना येथील पीकनीक हॉटेलजवळ दोन तरुणांमध्ये वाद सुरु असल्याचा कॉल आला. या कॉलवरुन कारवाई करत रात्री दोनच्या सुमारास पोलिसांनी दोन्ही व्यक्तींना पोलीस ठाण्यात आणले. यातील तक्रारदार यांचा जबाब नोंदवून घेत पोलिसांनी यादव विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. 

पोलीस याची माहिती देत असताना यादवने पोलीस ठाण्यात गोंधळ घालण्यास सुरूवात करुन ठाणे अंमलदार कक्षातील एका टेबलावर ठेवलेली काच फोडली. त्यानंतर खिडकीच्या काचेवर डोके आपटण्यास सुरूवात केली.

तीन काचा फुटल्याने यादव गंभीर जखमी झाला. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत यादवला ताब्यात घेतले. त्याला तात्काळ उपचारांसाठी जोगेश्‍वरी पुर्वेकडील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल केले. मात्र उपचार करुन घेण्यास नकार देत यादवने रुग्णालयातही गोंधळ घालण्यास सुरूवात केली. अखेर पोलिसांनी त्याच्यावर उपचार करुन घेत पोलीस ठाण्याला आणून अटकेची कारवाई केली आहे.

Tags : Mumbai, Mumbai news, Rabid Mathadi, Worker razzle, police Station,