Sat, Jul 20, 2019 13:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मातंगांसाठी ८ टक्क्यांच्या आरक्षणाला रिपाइंचा पाठिंबा

मातंगांसाठी ८ टक्क्यांच्या आरक्षणाला रिपाइंचा पाठिंबा

Published On: Aug 04 2018 1:40AM | Last Updated: Aug 04 2018 1:15AMमुंबई : प्रतिनिधी

मातंग समाजाला स्वतंत्र 8 टक्के आरक्षण या प्रमुख मागणीसह लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाला 500 कोटींचा निधी, मातंग समाजाच्या विकासासाठी लहूजी वस्ताद साळवे अभ्यास आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात व मुंबईत अण्णाभाऊ साठेंचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याच्या मागणीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने पाठिंबा जाहीर केला आहे.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 98 व्या जयंतीनिमित्त चेंबूर येथील सुमननगरमध्ये आयोजित केलेल्या सभेत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी हा पाठिंबा जाहीर केला.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न किताब देऊन गौरवण्यात यावे या मागणीचे पत्र आपण केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पाठविले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. आठवले म्हणाले,  अण्णाभाऊ साठे हे अवघे दीड दिवस शाळेत गेले होते. मात्र त्यांच्या साहित्याच्या तेजाने जग दीपले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांचे योगदान मोठे आहे. अण्णांनी त्यांची फकिरा ही कादंबरी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केली आहे.

जग बदल घालुनी घाव सांगून गेले आम्हा भीमराव ही काव्यपंक्ती लिहून अण्णाभाऊ साठेंनी सर्व अनुसूचित जाती-जमाती व बहुजनांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा मार्ग स्वीकारला पाहिजे, असे आवाहन केले आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारानुसार मातंग समाजाने पिवळा झेंडा घेऊन बौद्धांच्या निळ्या झेंड्यासोबत एकत्र आले पाहिजे. मातंग समाजाच्या ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला 5 एकर जमीन शासनाने द्यावी यासाठी आपण प्रयत्न करीत असून या  समाजातील तरुणांनी आता केवळ नोकरीच्या मागे न लागता त्यांनी उद्योग तथा सहकार क्षेत्राकडे वळले पाहिजे, असे आवाहन आठवले यांनी केले.