Mon, Jun 24, 2019 21:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › स्वप्ननगरीत पळून आलेल्या 706 मुलांना घरी पोहोचवले आरपीएफने

स्वप्ननगरीत पळून आलेल्या 706 मुलांना घरी पोहोचवले आरपीएफने

Published On: Feb 13 2018 2:23AM | Last Updated: Feb 13 2018 1:40AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

कोणी सलमान, कोणी शाहरुख, तर कोणी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर बनण्यासाठी, कोणी ऐश्‍वर्या-माधुरी बनण्यासाठी तर कोणी शहेनशहा अभिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी मुंबई स्वप्ननगरीत आपले घर सोडून आलेले असतात. 500 ते हजार किलोमीटरच्या अंतराहून केवळ डोळ्यात एकाच स्वप्नाची आस घेऊन मुंबईत आलेल्या देशभरातील 706 बाल हीरो-हिरालालना आरपीएफ आणि एनजीओच्या मदतीने पुन्हा वास्तव दुनियेत म्हणजेच त्यांच्या घरी सोडण्यात आले आहे. 2017 मध्ये अशा तब्बल 706 मुलांना मुंबईतील रेल्वे प्लॅटफॉर्मवरून ताब्यात घेतले आणि त्यांना सहीसलामत त्यांच्या घरी पोहोचवले.

528 मुले पूर्व आणि पश्चिम उपनगरातील रेल्वे स्थानकांवर सापडले. त्यातील 360 मुले आणि 168 मुली होत्या. मुलांचे वय साधारणपणे 13 ते 18 वर्षे आहे. मुंबई सेंट्रलवर घरातून पळालेल्या मुलांची संख्या सगळ्य़ात जास्त आढळली. मुंबई सेंट्रल स्थानकावरून राजस्थान, गुजरात, नवी दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधून गाड़्या ये-जा करत असतात.

राजस्थानमधील बिकानेरमधील 15 वर्षांचा मुलगा बॉलिवूड स्टार होण्यासाठी मुंबईत आला. सुरतमधून मुंबईत आलेला 11 वर्षांचा मुलगा सलमान खानचा प्रचंड चाहता होता. त्याने आपल्या तळहातावरच सलमानचा पूर्ण पत्ता गोंदवून घेतला होता. मथुरेतील 12 वर्षांच्या मुलाला सचिन तेंडुलकरसारखा महान क्रिकेटपटू व्हायचे होते. त्यामुळे तो तर चक्क क्रिकेटचे किट घेऊन पळून आला होता. काहींना मुंबई पाहायची असते तर काही आई-वडील रागावल्यामुळे घर सोडून आले होते. काश्मीरच्या 16 वर्षांच्या मुलीने हाजी अली दर्गा पाहण्यासाठी घर सोडले होते. एका मुलाने तो दहावीत नापास झाल्याने घर सोडले.

मुंबईतील सेंट्रल रेल्वे स्टेशनवर सर्वाधिक 129 मुले मिळाली. मायानगरी मुंबईतील उच्चभ्रू आणि ग्लॅमरस जीवनशैलीच्या आकर्षणातून ही मुले मुंबईला आली. त्यातील अनेकांना अभिनेता, गायक व्हायचे होते. मुंबईत ऑडिशन देऊन काहीतरी होऊ शकेल या हेतूने ही मुले मुंबईला पळाली. मुंबईत अशा प्रकारे येणार्‍या मुलांची संख्या आणखी मोठी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.