Sat, May 30, 2020 01:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'विरोधकांसाठी बिनकामाचे उद्योग खाते जाहीर करा'

'विरोधकांसाठी बिनकामाचे उद्योग खाते जाहीर करा'

Last Updated: Feb 28 2020 2:00AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

विरोधी पक्षाचे सध्याचे काम पहाता 'बिनकामाचे उद्योग खाते' जाहीर करुन त्यांना या खात्याचं प्रतिनिधित्त्व करण्याची संधी द्यावी, अशी मागणी करावी वाटते. अशी इच्छा कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्ती केली आहे.  

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाकडून शेतकरी आणि महिलांवरील अत्याचारांच्या विषयांवर जोरदार गदारोळ केला. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे. शेतकर्‍यांना न्याय द्या. कर्जमुक्तीच्या घोषणाचे काय झाले त्याचे उत्तर द्या, या विरोधकांच्या घोषणा विधानपरिषदेत दोन दिवस सुरु होत्या. त्यानंतर, तिसऱ्या दिवशी सावरकरांचा गौरव प्रस्ताव मांडण्यासाठी आक्रमक भूमिका घेत भाजपने शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. 

विरोधी पक्षाची ही आक्रमक भूमिका पाहता रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. 

काय म्हटले आहे पोस्टमध्ये?

वर्गात एखादा असा मुलगा असतो जो स्वत: अभ्यास करत नाही पण हुशार मुलांची पुस्तकं दडवून त्याला कसे कमी मार्क पडतील याचा आटोकाट प्रयत्न तो करत असतो. विरोधी पक्षाचे लोक सध्या हे एकमेव काम अगदी प्रामाणिकपणे करत आहेत. ही मंडळी पहिल्या दिवशी सभागृहाबाहेर महिला प्रश्नांवरुन आवाज उठवतात पण सभागृहात जेव्हा महिलांच्या प्रश्नावरून लक्षवेधी मांडण्यात येते. तेव्हा इतर मुद्यांवरून गोंधळ घालून आपले खरे रंग दाखवतात. विरोधासाठी विरोध करण्याहून सभागृहात शांततेत चर्चा करून प्रश्न सोडवणं अधिक गरजेचं आहे.

महाविकास आघाडीमार्फत काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीसह मित्रपक्ष एकत्रित येवून महिलांच्या सुरक्षेसंबंधात चर्चा करत आहेत, अशा वेळी भाजपची मंडळी गोंधळ घालतात. 

पाच वर्षानंतर जेव्हा निवडणुका होतील तेव्हा मात्र हीच मंडळी प्रचारात अगदी त्वेषाने महिला सुरक्षेतेवर बोलण्याचे नाटक करतील, तेव्हा त्यांना आठवणीने विचारा, महिला सुरक्षेच्या लक्षवेधीवर चर्चा सुरू होती, तेंव्हा आपण काय करत होता? अशी विचारणा करण्याचे आव्हान रोहित यांनी जनतेला केले आहे.