Mon, Jun 24, 2019 21:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आबा म्हणायचे,‘आपल्याला हे परवडणारं नाही’

आबा म्हणायचे,‘आपल्याला हे परवडणारं नाही’

Published On: Feb 23 2018 3:52PM | Last Updated: Feb 23 2018 5:00PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

एका राज्याचे उपमुख्यमंत्री, माजी गृहमंत्री असलेल्या व्यक्तीला त्यांच्या मुलाची हौस पुरवणे सहज शक्य आहे. पण, असाही एक अवलिया होऊन गेला जो सत्तेत असताना मुलांना ‘आपल्याला ही गोष्ट परवडणारी नाही’ असे सांगून गेला. तो अवलिया म्हणजे खुद्द राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील होय. आर.आर. आबांचे नुकतेच तृतीय पुण्यस्मरण झाले. या निमित्त त्यांच्याबद्दलची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

संबंधित बातमीआर.आर आबांच्या कन्येचा साखरपुडा संपन्न 

प्रशांत साजणीकर यांची एक पोस्ट आर.आर.पाटील यांचा मुलगा रोहीतने शेअर केली आहे. आबांनी मुलांचे कोणते हट्ट पुरवण्यास नकार दिला आणि त्यानंतर मुलांच्या वैचारीक पातळीत कोणते बदल झाले. याची पोचपावती या पोस्टमध्ये मिळते. रोहीतने आबांकडे ‘पग’ जातीच्या कुत्र्यासाठी केलेला हट्ट आणि त्यावर आबांनी त्याची घातलेली समजूत या पोस्टमध्ये दिसते. 

अंजनीसारख्या ग्रामीण भागात  शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आर. आर. आबांनी राज्यातील जनतेच्या मनावर अधिराज्य गाजविले. आपल्या मतदारसंघाला लागलेला दुष्काळाचा कलंक कायमचा पुसण्यासाठी अहोरात्र कष्ट केले. 35 वर्षाचे राजकीय जीवन कष्टकरी, गरीब, शेतकरी, शोषित यांच्यासाठीच समर्पित केले. याच आबांनी मुलांना काटकसरीचे धडेही दिले. 

प्रसंग १- वोडाफोन कंपनीची जाहिरात जोरात सुरु होती. त्यातल्या त्या पग जातीच्या कुत्र्याने समस्त श्वानप्रेमींना वेड लावलेलं. विशेषत: बच्चे कंपनी. त्यात मग उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री असलेल्या आर आर आबांचा लहानगा चिरंजीव तरी कसा मागे असेल? पोराने बापाकडे हट्ट धरला. आबा मला असलं कुत्रं हवंच आहे. बालहट्टच तो. बरचं समजावुन पोरगं बधत नाही असं लक्षात आल्यावर मग चित्रकुट बंगल्यावरची यंत्रणा कामाला लागली. असली कुत्री कुठे मिळतात, कोण विकतं याची माहिती काढण्यात आली. आणि एके दिवशी गाडीतुन पग जातीच्या कुत्र्याच्या पिल्लांच लाकडाच्या बंद पेटीतुन बंगल्यावर दिमाखात आगमन झालं. गोंडस पिल्लं  मस्तच  दिसत होती. चिरंजीव एकदम खुष झाला. मग त्याची किंमत किती याची विचारणा झाली. त्या छोट्या पिल्लाची पाच आकडी किंमत ऐकुण आबा सचिंत झाले. मग तसल्या प्रकारच्या कुत्र्यांना खायला काय लागतं, औषधं कुठली लागतात, लसी कुठल्या लागतात या सगळ्यांची विचारणा झाली. त्या पिल्लाला सांभाळण्याचा मासिक खर्च किती याचा हिशेब करण्यात आला. हा सगळा खर्च ऐकल्यावर आबांनी त्यांच्या लहानग्या मुलाला जवळ बोलावुन समजावुन  सांगितलं  की  बाबा रे आपल्याला हा खर्च काही झेपणार नाही. छोटा मुलगा हिरमुसला पण त्या समजुतदार मुलाने पुन्हा आपल्या आबांकडे कुत्र्यासाठी हट्ट केला नाही. 


प्रसंग २- चित्रकुट या बंगल्यावर आबा एकटेच रहात असत. उन्हाळ्याच्या सुट्टीत मात्र आबांचं कुटुंब अंजनीहुन सुट्टीसाठी मुंबईला येत असे. बरोबर भाऊ आणि बहीणींची पण मुलं असत. एरवी शांत आणि गंभीर असलेला चित्रकुट बंगला बच्चे कंपनी मुळे अगदी गजबजुन जात असे. एके दिवशी संध्याकाळी सर्व बच्चे कंपनीला घेवुन डीनरला जायचा बेत झाला. निघताना आबांनी माझ्याकडे पैसे ठेवायला दिले. एका गाडीत आबा आणि सगळ्या मुली आणि दुसर्‍या गाडीत सगळी मुलं आणि मी असा आमचा ताफा वरळीच्या कॉपर चिमणी या रॆस्टारंट कडे रवाना झाला. टेबल आधीच बुक करुन ठेवलेलं. मस्त गप्पा गोष्टी, हास्य मस्करी करत सगळ्या मुलांनी जेवणाचा आनंद घेतला. कायम पोलीसांच्या गराड्यात असलेले आबा मुलांच्या सहवासात खुष होते. जेवण झाल्यावर बील घ्यायला मी गेलो तर हॉटेलवाला बीलच देईना. म्हणाला आमच्या हॉटेलमधे आबा आले हाच आमचा सन्मान आहे. मी त्याला समजावलं असं करु नका आबांना ते आवडणार नाही. तरी तो ऐकेना. मग मी आबांना ही गोष्ट सांगितली. ते म्हणाले असं केलं तर पुन्हा त्याच्या हॉटेलमधे पाय सुध्दा ठेवणार नाही असं त्याला बजावुन सांग. शेवटी हॉटॆलवाल्याचा नाईलाज झाला आणि त्याने बील दिले आणि मी ते चुकते केले. खरी गोष्ट पुढेच आहे. जातानाही आबा पुढच्या गाडीत होते. आबांचा छोटा मुलगा मागे मागच्या गाडीत माझ्या शेजारी बसला होता. त्याने हळुच मला विचारले " काका, किती बील झालं हो ! " मी स्तिमीत झालो. ज्याचे वडील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री होते त्या मुलाला कुतुहल होतं, काळजी होती की आपल्या वडीलांना ही पार्टी द्यायला किती खर्च आला असेल !!


एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. २० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या आबांनी आपल्या मुलांना कोणत्या संस्कारात वाढवले त्याची झलक देणारे हे प्रसंग. आजकालच्या साध्या नगरसेवकांच्या दिवट्यांचे रुबाब पाहिले की वरील  प्रसंग हमखास आठवतात आणि आबांची तीव्रतेने आठवण होते. 
प्रशांत साजणीकर. १६ फेब्रुवारी २०१८.

 

संबंधित बातम्या
 

ब्लॉग :आबांच्या जाण्याने ‘स्वर्ग श्रीमंत तर पृथ्वी गरीब झाली’ 

ब्लॉग :आबांच्या जाण्याने ‘स्वर्ग श्रीमंत तर पृथ्वी गरीब झाली’ 

ब्लॉग : हिमालयाची उंची गाठणारे आबा

..तर आमचे आबा वाचले असते : स्मिता पाटील