Sat, Oct 19, 2019 05:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कारशेडसाठी कांजूरची जागा का नको? : हायकोर्टाचा सवाल

कारशेडसाठी कांजूरची जागा का नको? : हायकोर्टाचा सवाल

Published On: Sep 19 2019 1:30AM | Last Updated: Sep 19 2019 1:13AM
मुंबई : प्रतिनिधी 

मुंबईतील संवेदनशील आरे कॉलनीतील हजारो झाडांचा बळी घेऊन आणि पर्यावरणाचा र्‍हास करून मेट्रो कारशेड उभारण्याऐवजी  कांजूरमार्ग येथे मोकळ्या जागेचा पर्याय म्हणून का विचार केला जात नाही, असा सवाल उच्च न्यायालयाचेे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने बुधवारी उपस्थित केला. 

कांजूर येथील जागेचा वाद हा हायकोर्टात प्रलंबित असल्याने मेट्रो 3 साठी कांजूरच्या जागेत कारशेड उभारता येणार नाही, असे त्यावर एमएमआरडीएचे वकील अ‍ॅड. जी. डब्ल्यू मॅटोस यांनी सांगताच या जागेच्या विवादासंदर्भात  न्यायालयात  प्रलंबित असलेल्या याचिकेची कागदपत्रे गुरुवारीच सादर करा, असेही न्यायालयाने सरकारला बजावले.

मेट्रो कारशेडसाठी आरेत होणारी 2646 झाडांची कत्तल रोखण्यासाठी जनआंदोलन उभे राहत असतानाच तब्बल 51 याचिकांवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यापैकी वनशक्ती या सामाजिक संस्थेच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली आणि न्यायालयानेच कांजूरचा पर्याय चर्चेत आणला. 

फॉरेस्ट म्हणजे काय

वन (फॉरेस्ट) म्हणजे काय ? त्याचे प्रकार काय आहेत हे निश्चित करण्याचे आदेश 22वर्षांपूर्वी  राज्यांना दिले होते.परंतु महाराष्ट्रात सरकारने अद्यापही वन म्हणजे काय त्याची संज्ञाच ठरवलेली नसल्याने न्यायालयाने  नाराजी व्यक्त करत ताशेरे ओढले. सरकारने वन म्हणजे काय याची 
संज्ञाच ठरवली नसेल तर पुढचे सारे कठीण आहे, असेही मत व्यक्त केले.