Sat, Dec 14, 2019 06:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महापालिकेचे पाणी आता डोळे झाकून प्या

महापालिकेचे पाणी आता डोळे झाकून प्या

Published On: May 16 2019 2:08AM | Last Updated: May 16 2019 1:59AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

दूषित पाण्याचा प्रश्‍न अनेक शहरांच्या गळ्यातील धोंड बनलेला असतानाच मुंबई महापालिकेने मात्र पुरवठा करण्यात येणारे पाणी स्वच्छ असल्याची हमी देऊन प्रत्यक्ष नळातून पडणारे पाणीही मुंबईकर बिनधास्तपणे पिऊ शकतात, असे छातीठोकपणे सांगितले आहे. मात्र, नळातून येणारे पाणी पिण्यापूर्वी नागरिकांनी  इमारतीवर किंवा इमारतीखाली असलेल्या पाण्याच्या टाक्या व त्यांना जोडलेले पाईप स्वच्छ आहेत का, याची मात्र खात्री करून घ्यावी असा सावधानतेचा इशाराही दिला आहे.  

जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमानुसार गोळा करण्यात आलेल्या पाण्याच्या सॅम्पल्समध्ये साधारणतः 5 टक्के सॅम्पल्समध्ये कॉलीफॉर्म बॅक्टेरिया आढळले तरी ते पाणी पिण्यास योग्य असते. मात्र, मुंबई महापालिकेने सन 2018-19 मध्ये गोळा केलेल्या सॅम्पल्समध्ये साधारणतः 0.7 टक्के इतक्या अल्प सॅम्पल्समध्ये कॉलीफॉर्म बॅक्टेरिया आढळले आहेत. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेच्या मापदंड किंवा नियमांचा विचार करता मुंबई महापालिकेकडून पुरवठा होणारे पाणी कितीतरी अधिक सुरक्षित आहे. 

आरोग्य उत्तम राखण्यासाठी शुद्ध पाणी प्यायला मिळणे हाही महत्त्वाचा घटक असतो. याचा विचार करता  मुंबई महापालिकेकडून पुरवठा करण्यात येणारे पाणी नेहमीच शुद्ध असते. त्यामुळे ज्या शहरात वर्षभरात किमान लाखभर लोक अतिसाराने आजारी पडतात, त्या शहरासाठी जागतिक आरोग्य संघटनेने घालून दिलेल्या मापदंडापेक्षाही पाणी शुद्ध असणे ही दिलासादायक बाब आहे. जागतिक पातळीवर स्वच्छ पाणी असणार्‍या उदंचन केंद्रामध्ये भांडूप येथील उदंचन केंद्राचाही समावेश आहे. मात्र, एकदा तेथून पाणी बाहेर आल्यानंतर पाणी वाटप यंत्रणांमधील दोषांमुळे ते पुढे अशुद्ध होत जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.  

कॉलीफॉर्म बॅक्टेरिया खरेच घातक आहे?  

मुंबई महापालिकेकडून पाण्याच्या सॅम्पल्सची तपासणी करण्यात आली. त्यातील 0.7 टक्के सॅम्पल्समधील 0.15 टक्के सॅम्पल्समध्ये कॉलीफॉर्म बॅक्टेरिया वर्गवारीतील ई-कोली हा बॅक्टेरिया आढळून आला आहे. मात्र, उर्वरित सॅम्पल्समध्ये आढळलेले कॉलीफॉर्म बॅक्टेरिया सहसा घातक असत नाहीत. 

 पाण्याच्या शुद्धीकरणामध्ये झालेली प्रगती  
     2012-13 मध्ये महापालिकेकडून पुरवठा होणार्‍या पाण्यामध्ये कॉलीफॉर्म बॅक्टेरियाचे प्रमाण होते, 17 टक्के.
     2018-19 मध्ये पाण्याची शुद्धता वाढून आता कॉलीफॉर्म बॅक्टेरियाचे प्रमाण अवघ्या 0.7 टक्क्यांवर आले आहे. 

सोसायट्यांनी घ्यायची काळजी      

     पाणीपुरवठा नळांमध्ये गळती आहे का, हे पाहावे. 
     दर तीन महिन्यांनी इमारतीखालील व इमारतीवरील पाण्याची टाकी स्वच्छ करावी. 
    शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी पालिकेने घेतलेली काळजी 
     जमिनीखाली सुमारे 80 किलोमीटर लांबीचे कालवे बांधले आहेत.
     पाण्याचे दूषितीकरण टाळण्यासाठी जुन्या झालेल्या पाईपलाईन बदलून नवीन टाकल्या आहेत. 
     पाण्याची सॅम्पल्स तपासणार्‍या प्रयोगशाळेत सुधारणा करण्यासाठी  2013 मध्ये नीरीची नियुक्ती करण्यात आली.
     झोपडपट्टी परिसरात मुख्य पाईपलाईनला होणार्‍या अवैध जोडण्या बंद करण्यात आल्या आहेत. 
    पाण्याचे सॅम्पल्स कसे घेतले जातात?
     पाण्याचे दररोज 125 सॅम्पल्स घेतले जातात व त्याच दिवशी त्याची प्रयोगशाळेत तपासणी केली जाते.
     साधारणतः 2800 ते 3000 सॅम्पल्स दरमहा गोळा केले जातात. 
     दरवर्षी साधारणतः 36 हजार सॅम्पल्स तपासले जातात.