Thu, Nov 15, 2018 14:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याणच्या हाजीमलंग दर्ग्यात जबरदस्तीने होते पूजा!

हाजीमलंग दर्ग्यात घुसून जबरदस्तीने होते पूजा!

Published On: Dec 11 2017 1:55AM | Last Updated: Dec 11 2017 10:23AM

बुकमार्क करा

उल्हासनगर : वार्ताहर 

गेल्या काही महिन्यांपासून कल्याणजवळील हाजी मलंग दर्ग्यात घुसून काही लोक जबरदस्तीने आरती करून धार्मिक भावना भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप हाजी मलंग ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांनी केला आहे. यासंदर्भात 7 महिन्यांपासून पोलिसांत तक्रार केली जात असतानाही कोणतीही कारवाई झाली नसल्याचे पदाधिकार्‍यांनी सांगितले. 

अंबरनाथ तालुक्यातील दुर्गम डोंगरावर हाजी अब्दुल रेहमान मलंगशा बाबाची दर्गा असून हाजी मलंगचा दर्गा या नावाने ते प्रसिद्ध आहे. गेल्या 700 ते 800 वर्षांपासून हा दर्गा अस्तित्वात असल्याचे मानले जाते. या दर्ग्याचे दर्शन घेण्यासाठी देशाच्या कानाकोपर्‍यातून व विदेशातून लाखो भाविक येथे येत असतात. हाजी मलंग बाबाचा उरूस दरवर्षी रूढी व परंपरेनुसार साजरा केला जातो. येत्या 27 ते 4 जानेवारी या कालावधीत हा उरूस संपन्न होणार आहे. 

मात्र, सात-आठ महिन्यांपासून रोज 25 ते 30 लोकांचा जमाव दर्ग्यात घुसून मलंग गड हा हिंदू धर्मियांचा असल्याचा दावा करून चिथावणीखोर घोषणाबाजी करत असतात. एवढेच नव्हे तर तेथे आरतीही करतात. विशेष म्हणजे जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांनी ट्रस्टच्या घटनेला मान्यता दिलेली असतानाही न्यायालयाचा अवमान करून दर्ग्यात घुसखोरी केली जाते. याबाबत वारंवार हिल लाईन पोलीस ठाणे, पोलीस उपायुक्त उल्हासनगर, पोलीस आयुक्त ठाणे यांच्याकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई केली गेली नाही, असा आरोप ट्रस्टचे अध्यक्ष माधव केळकर यांनी केला आहे.