Tue, Jul 16, 2019 01:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सार्वजनिक बांधकाम मंत्री उतरले वाहतूक कोंडीत

सार्वजनिक बांधकाम मंत्री उतरले वाहतूक कोंडीत

Published On: Dec 24 2017 1:45AM | Last Updated: Dec 24 2017 1:04AM

बुकमार्क करा

ठाणे : खास प्रतिनिधी

कळवा येथील रस्त्याच्या दुरुस्तीमुळे वाहतुकीवर घालण्यात आलेले निर्बंध, हार्बर रेल्वेने घेतलेला मेगाब्लॉक आणि जोडून आलेल्या सुट्या यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या वाहतूक कोंडीची दखल घेऊन ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे आणि ऐरोली येथील टोलनाक्यांना भेटी देऊन कुठल्याही परिस्थितीत टोल नाक्यांवर वाहतूक कोंडी होता कामा नये, असे आदेश दिले. नवी मुंबईहून एरवी विटावा मार्गे ठाण्यात येणार्‍या वाहनधारकांनी ऐरोलीला टोल भरल्याची पावती दाखविल्यास ठाणे टोलनाक्यावर टोल वसूल करू नये, अशा सूचना नामदार शिंदे यांनी टोल कंत्राटदाराला दिल्या आहेत. 

ऐरोली येथील टोलनाक्यावर दोन्ही दिशेकडे टोलवसुलीसाठी प्रत्येकी दोन लेन वाढवण्याचे आदेश देत ऐरोली आणि ठाणे येथील टोलनाक्यांवर पिवळ्या पट्टीच्या नियमाचे पालन न केल्यास कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.  ऐरोलीमार्गे ठाण्यात येणार्‍या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यातच हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक आणि जोडून आलेल्या सुट्या यामुळे अनेकजण बाहेरगावी निघाल्यामुळेही मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत आहे. त्याचे परिणाम टोलनाक्यांवर दिसू लागताच टोलनाक्यांवर धाव घेत पिवळ्या पट्टीच्या नियमाचे कठोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ठाणे येथील टोलनाक्यांवर मनुष्यबळ आणि टोलवसुलीच्या मशिन्सची संख्या वाढवण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच, ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.