Sat, Apr 20, 2019 18:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोठारी कंपाऊंडमधील पब, हुक्का पार्लर सुरूच

कोठारी कंपाऊंडमधील पब, हुक्का पार्लर सुरूच

Published On: Dec 31 2017 2:07AM | Last Updated: Dec 31 2017 1:24AM

बुकमार्क करा
ठाणे :  प्रवीण सोनावणे 

कमला मिलमध्ये लागलेल्या भीषण आगीत 14 लोकांचा बळी गेल्यानंतर मुंबई महापालिकेने तत्परता दाखवत पालिकेच्या 5 अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई केली.  ठाण्यात मात्र फायर ब्रिगेडची एनओसी नसलेल्या कोठारी कंपाऊंडवर महासभेत निर्णय होऊनही पालिका प्रशासनाला कारवाई करणे शक्य झालेले नाही. फायर ब्रिगेडची एनओसी नसल्याचे या विभागाचे अधिकारी कबुली देत असून अतिक्रमण विभाग कारवाई करण्याची वाट अग्निशमन विभाग बघत आहे. तर कोठारी कंपाऊंडमधील गाळेधारकांच्या सुनावणी घेण्यात अतिक्रमण विभाग दंग असून दोन्ही विभागाच्या दुर्लक्षामुळे अजूनही कोठारी कंपाऊंडमध्ये सर्रास पब व हुक्का पार्लर रात्री उशिरापर्यंत चालत आहे. यामुळे कमला मिल सारखी घटना होण्याची वाट पालिका प्रशासन बघत आहे का, असा प्रश्‍न आता सर्वसामान्य ठाणेकरांनी उपस्थित केला आहे. 

मुंबईमधील पब व हुक्का संस्कृतीने ठाण्यातही आता घट्ट पावले रोवली आहेत. ठाण्यातील वादग्रस्त ठरलेल्या कोठारी कंपाऊंडमध्ये रात्री उशिरापर्यंत हॉटेल, पब  हुक्का पार्लर सर्रास  सुरु असून याकडे गेल्या अनेक वर्षांपासून पालिका व पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. कोठारी कंपाऊंडमध्ये सुरु असलेल्या पब आणि हुक्का पार्लर हे सर्व प्रकारचे नियम धाब्यावर बसवून सुरु असून यात सुरक्षेचे कोणतेही नियम पाळण्यात आलेले नाहीत. विशेष म्हणजे ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाने ना हरकत प्रमाणपत्र दिले नसल्याचे पत्र शासनाला पाठवले असतानाही हुक्का पार्लर चालवणार्‍यांनी वर्षभरात फायरचे ना हरकत प्रमाणपत्र आणून देऊ असे शासनाच्या इतर विभागांना दिल्याची माहिती नजीब मुल्ला यांनी सभागृहात दिली होती. एखादी मोठी दुर्घटना घडली तर फायरची गाडीही येथे जाऊ शकत नसल्याने मोठी जीवित हानी होईल, अशी भीती मुल्ला यांनी व्यक्त केली. एवढे नियम धाब्यावर बसवले असताना महापालिकेने आतापर्यंत का कारवाई केली नाही, असाही प्रश्‍न सर्वसाधारण सभेत उपस्थित करण्यात आला. 

पालिका अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी आपण धडक कारवाई करूच शिवाय प्रथम या गाळेधारकांना 260 प्रमाणे नोटीसा बजावून त्याची तातडीने सुनावणी करू शिवाय त्यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामाचे मोजमाप करून धडक कारवाई करू असे उत्तर दिले होते. अतिरिक्त आयुक्त चव्हाण यांच्या उत्तरावर सदस्यांनी आक्षेप नोंदवला होता. ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर, अशोक वैती, आश्रित राऊत, नारायण पवार, सभागृह नेते नरेश म्हस्के, माजी विरोधी पक्ष नेते नाजीब मुल्ला यांनी आक्षेप घेऊन गाळेधारकांना अभय देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे आरोप केला होता. ज्या प्रमाणे शहरातील बारवर धडक नोटिसविना कारवाई केली तशी कारवाई कोठारी कंपाऊंडमधील अनधिकृत बांधकामांवर करण्यात यावी अशी मागणीच केली होती. 

त्यानंतर महापौर मीनाक्षी शिंदे यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली. रस्ता रुंदीकरण करताना नागरिकांना कोणत्याही प्रकारची नोटीस दिली जात नाही मात्र कोठारी कंपाऊंडमध्ये नियमच धाब्यावर बसवले असताना त्यांना नोटीस देण्याची काय गरज आहे, असे सांगून येत्या 6 दिवसात कारवाई करावी असे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत एकही महासभा चालू देणार नाही असा इशारा त्यावेळी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिला. महापौरांच्या इशार्‍यानंतर केवळ थातुरमातुर कारवाई करून प्रकरण थंड  करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला असून आजघडीला कोठारी कंपाऊंडमध्ये  रात्री उशिरापर्यंत हुक्का पार्लर, पब सुरु असून पालिकेने कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. 

स्थानिक पोलीसांची भूमिका संशयास्पद  

कोठारी कंपाऊंड हे  चितळसर-मानपाडा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येत असून रात्री उशिरापर्यंत कोठारी कंपऊंडच्या बाहेर नशेत तरुण पाहायला मिळतात. अनेक नागरिकांनी याबाबत तक्रारीही केल्या आहेत. मात्र तरीही कोठारी कंपाऊंडमधील हुक्का पार्लर रात्री उशिरापरापर्यंत  सुरु असतात. याबाबत  नागरिकांकडून संशय व्यक्त करण्यात येत आहे. 

पालिका आयुक्तांचेही दुर्लक्ष 

ठाण्यात धडाकेबाज कारवाई करणार्‍या आयुक्त  संजीव जयस्वाल यांनीही कोठारी कंपाऊंडवर ठोस कारवाई केली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आयुक्तांनी आतापर्यंत अनेक अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवला आहे. मात्र कोठारी कंपाऊंडवर अद्याप का कारवाई होऊ शकली नाही याबाबत प्रश्‍नचिन्ह  निर्माण झाले आहे. 

कोठारी कंपाऊंड विषयी 

मानपाडा परिसरात 27 एकरमध्ये कोठारी कंपाऊंड विस्तारले असून गेल्या वर्षी 15 ते 20  फुटाच्या रस्ता रुंदीकरणासाठी कोठारी कंपाऊंडमधील काही बांधकामे तोडण्यात आली होती. महासभेत हा विषय निघाल्यानंतर 100 गाळेधारकांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत.