Mon, Mar 25, 2019 04:55
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अल्पवयीन मुलीकडून वेश्याव्यवसाय करून घेणार्‍या त्रिकुटाला बेड्या

अल्पवयीन मुलीकडून वेश्याव्यवसाय करून घेणार्‍या त्रिकुटाला बेड्या

Published On: Jan 11 2018 1:31AM | Last Updated: Jan 11 2018 12:52AM

बुकमार्क करा
भिवंडी : वार्ताहर

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या एएचटीसी शाखेने भिवंडीतील रांजणोली बायपास नाका येथील लॉजिंग अँड बोर्डिंगवर धाड टाकून तेथे बांगलादेशी 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीकडून वेश्याव्यवसाय करणार्‍या दलालासह मॅनेजर, वेटर अशा तिघांना बेड्या ठोकल्या.  दलाल इब्राहिम दस्तगीर शेख (41), मॅनेजर हरिप्रसाद शेट्टी आणि वेटर रमाकांत राऊत (35) अशी अटक करण्यात आलेल्या त्रिकुटाची नावे आहेत.

पीडित तरुणी मुळची बांगलादेशामध्ये राहणारी असून सध्या ती कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत जय मल्हार ढाब्यासमोरील झोपडीत राहते. तर दलाल इब्राहिम हा रिक्षाचालक असून तो भिवंडीतील शांतीनगर परिसरात राहतो. इब्राहिम हा फोनवरून ग्राहकांशी संपर्क साधून कल्याण-भिवंडी रोडवरील रांजणोली बायपास नाक्यालगतच्या राज लॉजिंग अँड बोर्डिंगवर येण्यास सांगत असे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक लॉजिंग अँड बोर्डिंग असून यापूर्वीही अनेकदा या परिसरात पोलिसांच्या छापेमारीत बांगलादेशी महिला वेश्याव्यवसाय करताना आढळून आल्या आहेत.

पुन्हा याच परिसरातील राज लॉजिंग अँड बोर्डिंगमध्ये अनैतिक धंदे सुरु असल्याची माहिती ठाणे एएचटीसी शाखेच्या पोलिसांना मिळाली. या माहितीनुसार सदर शाखेच्या पोलिसांनी सोमवारी या लॉजवर अचानक धाड टाकली. पोलिसांनी तेथे अव्याहतपणे चालणार्‍या अनैतिक धंद्याचा पर्दाफाश केला. कारवाईदरम्यान एका 17 वर्षीय बांगलादेशी तरुणीची मानवी तस्करांच्या तावडीतून सोडवणूक केली. तसेच दलाल इब्राहिम, लॉज चालक तथा मॅनेजर हरिप्रसाद शेट्टी याच्यासह रमाकांत राऊत याला ताब्यात घेवून कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली.या त्रिकुटाला न्यायालयात हजर केले असता 15 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 

विशेष म्हणजे या गुन्ह्यात आणखी दोघांचा समावेश असल्याचे तपासात आढळून आले आहे. मात्र पोलिसांनी त्यांना अद्याप ताब्यात घेतले नसल्याची माहिती समोर आली असून पीडित तरुणीची सुटका करून तिची महिला व बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत देशमुख करीत आहेत.