Wed, Aug 21, 2019 20:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दुधासाठी ७०:३० फॉर्म्युल्याचा प्रस्ताव

दुधासाठी ७०:३० फॉर्म्युल्याचा प्रस्ताव

Published On: May 10 2018 2:00AM | Last Updated: May 10 2018 1:20AMमुंबई : प्रतिनिधी

ऊस उत्पादकांना उत्पादन खर्चावर आधारित 70:30 या फॉर्म्युल्यानुसार दर देण्याचे सूत्र निश्‍चित करण्यात आले त्याच आधारावर दूध उत्पादकांनाही दर देण्यासाठीचा कायदा करण्यात येणार आहे. सरकार याबाबत सकारात्मक असल्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दूध आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी चर्चेवेळी सांगितले.

आ. बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली प्रहार संघटनेने दूध दरासंदर्भात जानकर यांची भेट घेतली. दुधाचा उत्पादन खर्च निश्‍चित करण्यासाठी नेमलेल्या समितीमध्ये कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ व दूध उत्पादकांच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात येईल. त्यांच्याकडून येणार्‍या सूचनांच्या आधारे हा दर निश्‍चित करण्यात येणार आहे. सहकारी संघ व खासगी संस्थांनी सरकारने निश्‍चित केलेला दर द्यावा, यासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगून, दर न देणार्‍या संघांवर कारवाई केली जात असल्याचे जानकर यांनी सांगितले.

फॅट व एसएनएफमध्ये बदल

दूध संघांनी शेतकर्‍यांचे किती पैसे दिले, याची माहिती घेण्यासाठी  राज्यातील सर्व तालुका व जिल्हा संघांची तपासणी करण्यात येणार असून, सरकाने फॅट व एसएनएफच्या दरात बदल केला आहे. 3.5 व 8.5 या अनुक्रमे फॅट व एसएनएफ च्या प्रमाणात 3.2 व 8.3 असा बदल करण्यात आला आहे. त्यानुसार या प्रमाणानुसार दूध स्वीकारण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. 

पशुखाद्य कारखान्यांना 50 टक्के अनुदान

दुधाळ जनावरांचे वाटप केवळ मागासवर्गीय कुटुंबांनाच करण्यात येत होते; ते आता सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्‍तींनाही करण्यात येणार असल्याचे सांगून, विकेंद्रित स्वरूपात पशुखाद्याचे उत्पादन करण्यात येणार असून, कारखाने स्थापन करण्यासाठी 50 टक्के अनुदान देण्यात येणार असल्याचेही जानकर म्हणाले.