Sun, May 19, 2019 13:59
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › स्वखर्चाने इमारतीची दुरुस्ती करणार्‍या सोसायट्यांना मालमत्ता करात सूट!

स्वखर्चाने इमारतीची दुरुस्ती करणार्‍या सोसायट्यांना मालमत्ता करात सूट!

Published On: Mar 03 2018 1:46AM | Last Updated: Mar 03 2018 1:19AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबईतील 70 ते 100 वर्षाच्या जुन्या इमारतींची स्वखर्चाने दुरूस्ती केल्यास त्या गृहनिर्माण सोसायटीला मालमत्ता करात पुढील 10 वर्षापर्यंत सूट देण्याची मागणी भाजपाने केली आहे. याला पालिका प्रशासन अनुकूल असल्यामुळे जुन्या इमारतींमध्ये राहणार्‍या सुमारे दोन ते अडिच लाखाहून जास्त सदनिकाधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दक्षिण मुंबई व दादर, परळ, वरळी, मुंबई सेंट्रल भागात 50 ते 100 वर्ष जुन्या हेरीटेज व अन्य इमारती आहेत. यातील अनेक इमारती या त्या त्या भागाची ओळख सांगतात. मुंबईत येणारा देशी-विदेशी पर्यटक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह महापालिका मुख्यालय इमारत व अन्य पर्यटन स्थळांना भेटी देतात. अशावेळी पर्यटक मुंबई शहरातून फेरफटका मारत असताना, त्यांना जीर्ण झालेल्या जुन्या हेरीटेज व अन्य इमारती दिसतात.

मुंबईच्या मुख्य रस्त्याच्या लगत असलेल्या 50 ते 100 वर्ष जुन्या इमारतींची दुरूस्ती करणे आवश्यक आहे. यातील काही इमारती खाजगी असल्यामुळे त्यांची दुरूस्ती करणे पालिकेला शक्य नाही. त्यामुळे या इमारती रहिवाशांनी पुढाकार घेऊन दुरूस्त केल्यास अशा इमारतींना दुरूस्तीनंतर 10 वर्ष मालमत्ता करात सूट द्यावी, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक डॉ. राम बारोट यांनी केली आहे. दक्षिण मुंबईसह काळबादेवी, गिरगाव, ग्रॅण्टरोड, मुंबई सेंट्रल, वरळी, परळ, लालबाग, दादर, शिवाजी पार्क भागात 70 ते 100 वर्षाच्या सुमारे 4 हजाराहून जास्त इमारती आहेत. यातील काही इमारती म्हाडाच्या अखत्यारित येतात. तर काही खाजगी व पालिकेच्या मालकीच्या जागेत आहेत. त्यामुळे इमारतींची डागडूजी करणे आवश्यक आहे. 

या इमारतीमधील रहिवाशांनी पुढाकार घेऊन, इमारतीची दुरूस्ती केल्यास पालिकेला मालमत्ता कठरात सूट देण्यास काहीच हरकत नसल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. पण यासाठी रहिवाशांकडून मागणी व प्रस्ताव दाखल होणे आवश्यक आहे.