Wed, Jul 17, 2019 18:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भिवंडीतील प्रकल्पग्रस्त शेतकरी ‘राज’दरबारी

भिवंडीतील प्रकल्पग्रस्त शेतकरी ‘राज’दरबारी

Published On: May 04 2018 1:49AM | Last Updated: May 04 2018 1:38AMभिवंडी : वार्ताहर

भिवंडी तालुक्यातील बुलेट ट्रेन व गॅस पाईपलाईन प्रकल्पाबाधित शेतकर्‍यांनी गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे कैफियत मांडली. राज दोन दिवस ठाणे, पालघर जिल्ह्याच्या दौर्‍यावर असून बुधवारी ते मुंबई-नाशिक महामार्गावरील वडपे येथील शांग्रीला रिसॉर्ट येथे मुक्कामी थांबले होते. यावेळी प्रकल्पबाधित शेतकर्‍यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.

दहेज गुजरात ते नागोठणे अशी इथेन गॅस पाईपलाईन तालुक्यातून जात आहे. मात्र, पडघा परिसरातील वाफाळे गावातील जमिनींचा शासनाने प्रसिद्ध केलेल्या राजपत्रात समावेश नसतानाही पोलिसी बळाचा वापर करून येथे पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. पाईपलाईन टाकणार्‍या कंपनीने स्थानिक लोकप्रतिनिधी, राजकीय नेतेमंडळी यांच्याशी आर्थिक हातमिळवणी केल्याचा आरोप करत न्याय मागावा तरी कोणाकडे? असा सवाल येथील शेतकर्‍यांनी उपस्थित केला आहे. 

बुलेट ट्रेनच्या मार्गात अचानक बदल करण्यात आला असून, तो आता तालुक्यातील दिवेअंजूर, कशेळी, काल्हेर, पूर्णा, कोपर, केवणी, खारबांव, मालोडी, पायगांव, पाये या दहा गावातून जात आहे. हा ठाणे-भिवंडी बुलेटमार्ग कोणाच्या फायद्याचा? असा सवाल शेतकर्‍यांनी केला. विविध प्रकल्पांसाठी जमीन दिलेल्या शेतकर्‍यांना आजपावेतो मोबदला दिलेला नाही. त्यामुळे आमचा शासनाच्या आश्वासनावर विश्वास नसल्याची खदखद राज ठाकरे यांच्याकडे शेतकर्‍यांनी व्यक्त केली. राज यांनी शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेवून संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा करून आपले प्रश्न सोडवले, जातील असे आश्वासन दिले. 

राजकीय बेबंदशाहीविरोधात मनसे वगळता सर्व विरोधक पक्ष घाबरून घरात बसले आहेत. शिवसेनाही रडीचा डाव खेळत असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली. मनसे पदाधिकारी बैठकीप्रसंगी शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जे अधिकारी शेतकर्‍यांवर दबावतंत्र वापरत असतील त्यांना मनसे स्टाईलने धडा शिकवा, असा आदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. दरम्यान पदाधिकारी बैठकीदरम्यान पत्रकारांना बाहेर काढा, असे जिल्हाध्यक्षांनी सांगितल्याने पत्रकारांमधून संताप व्यक्त झाला. तालुकाध्यक्ष जयवंत मांजे, मनविसे तालुकाध्यक्ष विजय भेरे, दिलीप भोपतराव, शहराध्यक्ष राजेश पाठारी, उपाध्यक्ष दिनेश कांबळे व कौस्तुभ लिमये यांनी झालेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली.

Tags : Mumbai, Project, affected, farmers, Bhiwandi, meet,  Raj Thackeray