Wed, Nov 21, 2018 14:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्लास्टिकबंदीविरुद्ध किराणा दुकानदारांचे बंड!

प्लास्टिकबंदीविरुद्ध किराणा दुकानदारांचे बंड!

Published On: Jun 26 2018 1:21AM | Last Updated: Jun 26 2018 1:15AMमुंबई : प्रतिनिधी

प्लास्टिकबंदीचे पडघम मुंबईत चांगलेच वाजत असून महापालिका अधिकार्‍यांनी रविवारी प्लास्टिक बंदीचे उल्लंघन करणार्‍या व्यावसायिकांकडून 4 लाखांचा दंड वसूल केला आहे. मात्र, हा दंड वसूल करताना त्यांनी लोअर परेल येथील फोनिक्स मिल कंपाऊंडमध्ये प्लास्टिक हँडग्लोव्हज घालून व्यवसाय करणार्‍या पाणीपुरी विक्रेत्यांकडून 5000 रुपयांचा दंड वसूल केल्याने ते टीकेचे धनीही झाले आहेत.  दरम्यान, प्लास्टिक बंदीमुळे किराणा दुकानदारांचे मोठे नुकसान होत असल्याने याबाबत योग्य तोडगा काढला नाही किंवा प्लास्टिकला पर्याय दिला नाही तर गुरुवारपासून राज्यव्यापी संप करण्याचा इशारा फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शाह यांनी दिला आहे.

राज्यात शनिवारपासून प्लास्टिकबंदी अस्तित्वात आली. मात्र, मुंबई महापालिकेच्या अधिकार्‍यांनी शनिवार हा पहिलाच दिवस असल्याने फेरीवाले, लहान लहान व्यापारी यांच्याबाबत काही अपवाद वगळता तितकेसे कडक धोरण न अवलंबता अनेक ठिकाणी ताकीद देण्याचे धोरण अवलंबले होते. रविवारी मात्र ही मोहीम चांगलीच कडक करण्यात आली. व्यावसायिक वर्गात त्याचे पडसादही लगेचच उमटू लागले होते.