Mon, Jun 17, 2019 02:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रेल्वे स्थानकांवर मराठी भाषेची दैना

रेल्वे स्थानकांवर मराठी भाषेची दैना

Published On: Aug 12 2018 1:09AM | Last Updated: Aug 12 2018 12:28AMमुंबई : प्रतिनिधी

एल्फिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीच्या प्रकरणानंतर पश्चिम रेल्वेने प्रवाशांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून स्थानकांच्या पायर्‍यांवर मराठीतून दिलेल्या संदेशातून मराठी भाषेची चांगलीच वाट लावली होती. त्यानंतरही त्यांच्यात काही सुधारणा झालेली नसून आता पुन्हा एकदा मध्य रेल्वेने मराठी भाषेचे अज्ञान दाखवून दिले. रेल्वे प्रशासनामध्ये मराठी भाषेबाबत असलेल्या सावत्र प्रेमावर पुन्हा एकदा जागरूक नागरिकांनी आठवण करून दिली. मध्य रेल्वेत मराठी अधिकारी नसल्यामुळे भाषांतर अ‍ॅपच्या मदतीने भाषांतर करून अक्षरामध्ये गोंधळ उडाल्याने नेटिझन्सने मध्य रेल्वेवर टीकेची झोड उठवली.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर उपलब्ध करून दिलेल्या वायफाय सेवेची माहिती देण्यासाठी लावण्यात आलेल्या फलकावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी लिहिण्याऐवजी सीएसटी असा उल्लेख असल्याचे दिसून येत आहे. स्थानकात जलद आणि मोफत वायफाय सेवा उपलब्ध आहे, याची माहिती प्रवाशांना देण्यासाठी स्थानकावर जलद , मोफत वायफाय मिलवा असे फलक लावण्यात आले आहे. फलकात मिळवा या शब्दाऐवजी मिलवा असे लिहिण्यात आले आहे. असे लेखन करून पुन्हा एकदा रेल्वेने आपल्याला मराठी भाषा येत नसल्याचे दाखवून दिले आहे. समाजमाध्यमावर हे फोटो सध्या चर्चेचा विषय बनत आहे. 

छत्रपती शिवाजी टर्मिनसचे नाव आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, असे करण्यात आले. रेल्वे प्रशासनाने शिवाजी महाराजांच्या नावापुढे महाराज असे नाव लिहून तसा बदल रेल्वे स्थानकाच्या पाट्यांमध्येही केला. परंतु, अजूनही रेल्वे प्रशासनाकडून सीएसएमटी या नावाचा उल्लेख पूर्णपणे केला जात नसल्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसशेजारी बस स्थानकावर लावलेल्या फलकावरून लक्षात येते. यापूर्वी एल्फिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीनंतर पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी स्थानकांवरील पायर्‍यांवर संदेश देणारे स्टीकर चिकटवण्यात आले होते. यामध्ये त्यांनी कृपया लहान चेंडू घेऊ नका,  कृपया हँड्राईल धरून ठेवा, कृपया एक पाऊल वगळू नका असा संदेश दिला होता. इंग्रजीतील शब्दांचा गुगलमध्ये टाकून मराठी भाषांतर करत लावलेल्या या संदेशातून रेल्वेने मराठीची तर पुरती वाटच लावली होती. आता पुन्हा त्यांनी मिळवाचे मिलवा करून मराठीची वाट लावली आहे.

शिवसेना तीव्र आंदोलन करणार

तातडीने दुरुस्ती न केल्यास शिवसेना तीव्र आंदोलन करणार आहे. ज्यांना मराठी येत नाही अशा लोकांनाच या जाहिराती करायला दिल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे प्रकार घडत आहेत, मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकार्‍यांना भेटून त्यांना याविषयी दुरुस्ती करायला सांगणार आहेत. या जाहिराती बदलायला सांगणार आहोत. आपण महाराष्ट्रात राहतो. मुंबईत राहतो. आपली मातृभाषा मराठी आहे, यात जर त्यांनी दुरुस्ती केली नाही, तर आम्ही शिवसेना स्टाईलने त्यांना हे बदलायला भाग पाडू.  - पांडुरंग सकपाळ, शिवसेना विभागप्रमुख