Mon, Jul 22, 2019 03:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई पालिकेच्या आयसीयू युनिट्सचे अखेर खासगीकरण!

मुंबई पालिकेच्या आयसीयू युनिट्सचे अखेर खासगीकरण!

Published On: Apr 19 2018 1:35AM | Last Updated: Apr 19 2018 1:34AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा 

डॉक्टरांच्या अपुर्‍या संख्येचे कारण पुढे करत, अखेर मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधील आयसीयू युनिटचे खासगीकरण करण्यात आले असून, या युनिटमध्ये दाखल होणार्‍या रुग्णांची यापुढे लुटमार होणे अटळ असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

खासगीकरणाच्या ठरावानुसार पालिकेच्या के. बी. भाभा बांद्रा, व्ही. एन. देसाई सांताक्रूझ, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटर जोगेश्वरी, सिध्दार्थ मनपा हॉस्पिटल गोरेगाव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल कांदिवली, भगवती बोरीवली, राजावाडी घाटकोपर, के. बी. भाभा कुर्ला, संत मुक्ताबाई हॉस्पिटल घाटकोपर, मालविया गोवंडी, फुले हॉस्पिटल, विक्रोळी, एम. टी. अग्रवाल मुलुंड या 12 हॉस्पिटलमधील आयसीयू युनिट खासगी संस्थांच्या ताब्यात देणार आहेत. या खासगीकरणाला भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी विरोध केला.

आयसीयू खासगी संस्थांच्या हातात देणे म्हणजे त्या संस्थांच्या नर्सिंग होमला पालिका हॉस्पिटलमधील रुग्ण सोपवण्यासारखे आहेत. आयसीयुमधील डॉक्टर रुग्णांना चांगल्या उपचारासाठी खासगी हॉस्पिटलचा सल्ला देऊन, गरीब रुग्णांना लुटण्याचे काम करतील, असा आरोपही कोटक यांनी केला. याला विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पाठिंबा देत, गरीबांची लुटमारी करणारा हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी केली. एवढेच नाही तर, पालिकेने आणलेले प्रस्ताव फेटाळून लावण्याची उपसूचना मांडली. याला भाजपाने पाठिंबा दिला. 

पालिका हॉस्पिटलमध्ये निवासी डॉक्टरांची संख्या कमी असल्यामुळे आयसीयू खासगी संस्थांच्या मार्फत चालवण्याचा निर्णय घेतला असल्याचे यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंगल यांनी स्पष्ट केले. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी रुग्णांच्या हितासाठी प्रस्ताव मंजूर करणे आवश्यक असल्याचे सांगितले. पण रवी राजा आपल्या मताशी ठाम असल्यामुळे त्यांनी प्रस्ताव फेटाळण्याची उपसूचना मागे घेण्यास नकार दिला. त्यामुळे शिवसेनेला नाईलाजाने प्रस्ताव फेटाळणे भाग पडले. मात्र त्यानंतरचे तीनही प्रस्ताव जाधव यांनी स्वत:च्या हजरजबाबीमुळे मंजूर केले. विशेष म्हणजे खासगीकरणाला विरोध करणारे भाजपावाले गप्प बसले. पण काँग्रेसने सभात्याग करून आपला निषेध नोंदवला.

खासगी हॉस्पिटलची चांदी 

पालिका हॉस्पिटलमधील आयसीयू याअगोदरही खासगी संस्थेच्या ताब्यात देण्यात आले आहेत. यात विलेपार्ले येथील कुपर व सांताक्रूझच्या व्ही. एन. देसाई हॉस्पिटलचा समावेश आहे. पण याचा आयसीयूमध्ये दाखल होणार्‍या अनेक रुग्णांना फटका बसला. रुग्णांना बाहेरून रक्त व अन्य तपासण्या करून आणण्यास भाग पडणे, औषधे बाहेरून आणण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना सांगणे, बेड शिल्लक नसल्याचे कारण पुढे करत अन्य खासगी हॉस्पिटलमधील आयसीयूमध्ये जाण्याची शिफारस करणे. यामुळे रुग्णांचा खर्च लाखोच्या घरात जातो. याचे कमिशन संस्थांना मिळत असल्यामुळे आता पालिकेतील आयसीयू युनिट चालवण्यासाठी अनेक संस्था पुढे आल्या आहेत. 

या सं स्थां क डे  जा णा र  आ य सी यू चा  ता बा

जीवन ज्योत चॅरिटेबल ट्रस्ट
क्रिटिकल केअर असोसिएटस्
इंटरव्हेन्शनल क्रिटिकल केअर
लाईफ लाईन मेडिकेअर