Sat, Jul 04, 2020 15:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सोमवारपासून खासगी कार्यालये, दुकाने उघडणार 

सोमवारपासून खासगी कार्यालये, दुकाने उघडणार 

Last Updated: Jun 05 2020 1:22AM
मुंबई/नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

सोमवारपासून मुंबईसह सर्व महापालिका क्षेत्रांत कंटेन्मेंट झोन वगळून इतर ठिकाणी दुकाने सुरू होणार असून, एकूण कर्मचार्‍यांच्या 10 टक्के उपस्थितीसह खासगी कार्यालये देखील सुरू करण्यासही परवानगी देण्यात आली आहे.  राज्य सरकारच्या निर्णयानुसार मुख्य सचिव अजोय मेहता यांनी गुरुवारी आदेश जारी केला.  दुसरीकडे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवी मानक कार्यप्रणाली (एसओपी) जारी करीत कंटेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणचे शॉपिंग मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंट, धार्मिक स्थळे सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

31 मे रोजी राज्य सरकारने तीन टप्प्यांत लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतचा आदेश गुरुवारी जारी  करण्यात आला. एकूण कर्मचार्‍यांच्या दहा टक्के कर्मचार्‍यांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली असल्याने इतर कर्मचार्‍यांना घरून काम करावे लागणार आहे. जे कर्मचारी कामावर येतील त्या कर्मचार्‍यांना संसर्ग होणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना देण्यात आली आहे. याशिवाय फेसमास्क, सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टन्सिंग या नियमांचे काटेकोर पालन करण्याची सूचनाही देण्यात आली आहे.  

याशिवाय लोकांना घराबाहेर आणि इतरत्र मोकळ्या जागेत व्यायाम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यावेळी गार्डन, ओपन गार्डनमधील व्यायामाचे कोणतेही साहित्य वापरता येणार नाही. सम आणि विषम पद्धतीने दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याच्या नियोजनाची व नियमांचे पालन करण्याची जबाबदारी ही पोलिस आणि महापालिका आयुक्तांवर असेल. 

रविवारपासून मुंबईसह एमएमआर आणि पुण्यातही वृत्तपत्र छपाई आणि वितरणास परवानगी देण्यात आली आहे. शैक्षणिक संस्था मात्र बंदच राहणार आहेत. ई-कंटेंट विकसित करणे, उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन आणि निकाल जाहीर करण्याची कामे मात्र संस्था करू शकतील.

महामुंबईत पासशिवाय प्रवास करा

मुंबई महानगर प्रदेशात  मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत नागरिक पासशिवाय ये-जा करू शकतील. आता पासची गरज राहणार नाही. अर्थात हा प्रवास दिवसा करावा लागेल.आंतरराज्य आणि आंतरजिल्हा प्रवास करण्यावरील निर्बंध कायम आहेत. मजूर, स्थलांतरित कामगार, पर्यटक यांच्या प्रवासावर आधीच्या नियमांप्रमाणे निर्बंध असतील. 

हॉटेल्स सशर्त सुरू होणार

नवी दिल्ली : केंद्राच्या नव्या सूचनांनुसार  मंदिरामध्ये प्रसाद तसेच तीर्थ वाटप तूर्त करता येणार नाही. हॉटेलमध्ये एकावेळी केवळ 50 टक्केच ग्राहकांना बसता येईल. ग्राहकांच्या साहित्याचे निर्जंतुकीकरण करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. हॉटेलमध्ये ग्राहकांना सामाजिक अंतर, चेहर्‍यावर मास्क अथवा फेस शिल्ड घालणे बंधनकारक राहील. अल्कोहोलयुक्त सॅनिटायझरने 20 सेकंदापर्यंत अथवा सामान्य साबणाने किमान 60 सेकंदापर्यंत हात धुण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात आला आहे.  65 अथवा त्याहून अधिक वय असलेल्या वरिष्ठ नागरिक, गर्भवती महिला, 10 वर्षांहून कमी वयाची मुले, मधुमेहग्रस्त तसेच इतर संबंधित आजारग्रस्तांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.