Wed, Jul 17, 2019 08:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › खासगी गुप्तहेर पंकज तिवारीला सीडीआर प्रकरणात अटक 

खासगी गुप्तहेर पंकज तिवारीला सीडीआर प्रकरणात अटक 

Published On: May 19 2018 1:33AM | Last Updated: May 19 2018 1:33AMठाणे : वार्ताहर 

बेकायदेशीर सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणी ठाणे पोलिसांनी बुधवारी दिल्लीतील पंकज तिवारी या खासगी गुप्तहेरास अटक केली. तिवारी याच्यावर यापूर्वी केंद्रीय मंत्री अरुण जेटलींचे सीडीआर काढल्याचा आरोप होता. ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने मोबाईल फोनचे सीडीआर बेकायदेशीरपणे काढणार्‍या टोळीचा पर्दाफाश जानेवारीमध्ये केला होता.

या प्रकरणामध्ये देशातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित यांच्यासह 15 आरोपींना अटक केली. गुप्तहेर किर्तेश कवी याला यापूर्वीच अटक केली होती. त्याच्या मदतीने गुप्तहेर लक्ष्मण ठाकूर याने काही सीडीआर मिळवल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर, 11 मे रोजी त्यालाही अटक करण्यात आली. तिवारी हा याप्रकरणी अटक केलेला अकरावा खासगी गुप्तहेर आहे. त्याच्या अटकेने एकूण आरोपींची संख्या 15 झाली आहे. या आरोपींमध्ये यवतमाळ येथील एका पोलीस शिपायाचाही समावेश आहे.

पोलीस कोठडीदरम्यान त्याच्याकडून पोलिसांना दिल्ली येथील खासगी गुप्तहेर पंकज तिवारी याची माहिती मिळाली. लक्ष्मण ठाकूरने पंकज तिवारीकडून काही सीडीआर मिळवल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने बुधवारी दिल्लीतून पंकज तिवारीला अटक केली. गुरुवारी दिल्ली येथील कडकड्डुमा न्यायालयाकडून पोलिसांनी त्याची प्रवासी कोठडी (ट्रान्झिट कस्टडी) घेतली. शुक्रवारी ठाण्याच्या न्यायालयासमोर हजर करून त्याची रीतसर पोलीस कोठडी घेतली जाईल.

ठाणे पोलीस लवकरच दाखल करणार आरोपपत्र

बेकायदेशीर सीडीआर प्रकरणात पोलीस लवकरच आरोपपत्र दाखल करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. आतापर्यंत अटक केलेल्यांची संख्या 15 झाली आहे. कोणत्याना कोणत्या प्रकारे हे सर्व जण या प्रकरणाशी संबंधित आहेत. एखाद्या व्यक्‍तीच्या संभाषणाचे सीडीआर मिळवून ते 25 ते 50 हजार रुपयांना  विकले जात होते. ठाणे पोलिसांच्या युनिट 1 च्या पथकाने या प्रकरणाचा छडा लावला होता. प्रसिद्ध महिला गुप्तहेर रजनी पंडित यांनाही अटक करण्यात आली होती. बराच काळ न्यायालयीन कोठडीत राहिल्यानंतर त्यांना जामिनावर सोडण्यात आले होते. त्याचबरोबर अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी यांच्या वकिलालाही याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले होते. मात्र पोलिसांनी बेकायदेशीरपणे त्यांना डांबून ठेवल्याचे ताशेरे उच्च न्यायालयाने मारल्यानंतर या वकिलाला सोडण्यात आले होते.