होमपेज › Mumbai-Thane-Raigad › खासगी आयटीआयला येणार सुगीचे दिवस?

खासगी आयटीआयला येणार सुगीचे दिवस?

Published On: Dec 31 2017 2:07AM | Last Updated: Dec 31 2017 1:30AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

विनाअनुदानित शाळांना जसे अनुदान देण्याचा मार्ग मोकळा केला आहे, त्याच प्रमाणे आता खासगी आयटीआयलाही अनुदानाचा मार्ग लवकरच मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईतील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून अनुदानाचा प्रस्ताव तयार झाल्यावर मंजूरीसाठी मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चेला जाण्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्र राज्य अशासकिय आयटीआय प्राचार्य व कर्मचारी संघटना आणि संचालनालयाचे संचालक यांची संयुक्त बैठक 5 एप्रिल 2016 रोजी पार पडली होती. त्यानंतर 25 मे 2016 रोजी यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र प्रस्तावात काही त्रुटींची पूर्तता करण्याच्या सूचना देत शासनाने संचालनालयाला हा प्रस्ताव पुन्हा पाठवला होता. सदर त्रुटींबाबत संचालनालयाकडेच माहिती उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहितीही त्यावेळी समोर आली होती. परिणामी, राज्यातील 2001 सालापूर्वीच्या खासगी आयटीआयची यादी, अभ्यासक्रमनिहाय तुकड्याची यादी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची संख्या यांचा अचूक तपशील प्रादेशिक कार्यालयाकडून संकलित 
करण्यात आली आहे. अखेर हा प्रस्ताव तयार करून त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी खाजगी आयटीआय कर्मचारी प्राचार्य संघटनांना दिले आहे.

संघटनेने 2001 सालापूर्वीच्या 165 आयटीआयची यादी प्रशासनाला दिलेली आहे. या आयटीआयमधील 1 हजार 400 युनिटमधील 1 हजार 800 कर्मचारी आणि या आयटीआयमध्ये प्रवेश घेणार्‍या तब्बल 30 हजारहून अधिक विद्यार्थ्यांचे भवितव्य अनुदानाअभावी धोक्यात आले आहे.

आयटीआयच्या माध्यमातून डिजीटल इंडिया, स्कील इंडिया, मेक इन इंडिया मोहिम यशस्वी होण्यास कुशल मनुष्यबळाचा पुरवठा होणार आहे. परिणामी, संचालनालयाने तत्काळ सुधारित प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यासाठी पाठपुरावा करणार असून खासगी आयटीआयचा हा प्रश्‍न कायमचा मार्गी लावरण्यात येईल असे प्राचार्य व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय बोरस्ते यांनी सांगितले.