Sat, Sep 21, 2019 04:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › खाजगी रुग्णालयांच्या मनमानी बिलवसुलीला चाप

खाजगी रुग्णालयांच्या मनमानी बिलवसुलीला चाप

Published On: Dec 15 2017 2:45AM | Last Updated: Dec 15 2017 2:20AM

बुकमार्क करा

मुंबई : विशेष प्रतिनिधी 

अव्वाच्या सव्वा बिल आकारणार्‍या खाजगी हॉस्पिटल्सना वेसण घालण्यासाठी लवकरच राज्यात रुग्णांच्या हिताचा कायदा करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधानसभेत दिली. 

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यात मोठ्या प्रमाणात रक्तसंकलन केले जात असून त्याचा रक्तपेढ्यांकडून धंदा केला जात असल्याचा मुद्दा लक्षवेधीद्वारे सभागृहात मांडला होता. या रक्तपेढ्यांवर नियंत्रण आणण्याची मागणी विखेंनी केली. त्यावेळी आमदारांनी खाजगी रुग्णालयांकडून  सामान्य पेशंटची कशी लूट सुरु आहे ते सांगितले. किती बिल घ्यावे याचे कोणतेही बंधन हॉस्पिटल्सवर नाही. त्यामुळे पेशंटची आर्थिक फसवणूक होत आहे. त्यावर सरकारने काहीतरी नियंत्रण आणण्याची मागणीही सभागृहात करण्यात आली. 

त्यावर डॉ. दीपक सावंत म्हणाले, भरमसाट बिल आकारणार्‍या हॉस्पिटल्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कायदा केला आहे. पण यासंदर्भात राज्यात देखील क्लिनिकल आस्थापनांसाठी कायदा लवकरच करू. या कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्व संबंधित संस्थांशी चर्चा झाली आहे. इंडियन मेडिकल कौन्सिलशी देखील चर्चा करण्यात आली आहे. आता या मसुद्याला अंतिम मंजुरी मिळवण्यासाठी विधी व न्याय विभागाकडून सल्ला घेण्यात येणार असल्याचेही सावंत यांनी सांगितले.