Tue, Jul 23, 2019 06:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कारागृहे म्हणजे कोंडवाडे; सुविधांचा अभाव

कारागृहे म्हणजे कोंडवाडे; सुविधांचा अभाव

Published On: Dec 17 2017 3:04AM | Last Updated: Dec 17 2017 2:11AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

शिक्षा झालेल्या आणि खटल्यात अटक झाल्यानंतर जामीन न मिळालेल्या छोट्या-मोठ्या खटल्यांतील गुन्हेगार कारागृहात खितपत पडले आहेत. त्यामुळे राज्यातील कारागृहांत आरोपींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मध्यवर्ती कारागृहासह सर्वच कारागृहे सध्या कैद्यांनी तुडुंब भरली आहेत. कैद्यांना ठेवण्याच्या क्षमतेपेक्षा सुमारे 10 हजारांहून जादा कैदी तुरुंगात आहेत.

राज्यातील कारागृहे कैद्यांचे कोंडवाडेच बनले आहेत. या कैद्यांना मूलभूत सुविधा देण्यासही सरकार अपयशी ठरले आहे. न्यायालयाने वेळोवेळी आदेश देऊनही आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत. राज्यभरातील कारागृहांतील कैद्यांची गर्दी कमी करण्यासाठी तसेच या कारागृहांत पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याच्या हेतूने शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली. कारागृह कर्मचार्‍यांचीही वानवाच आहे. सुमारे 25 टक्के अधिकारी, कर्मचारी पदे रिक्‍तच आहेत. राज्यातील नऊ मध्यवर्ती कारागृहांची एकूण क्षमता 14 हजार 841 असताना, ती 18 हजार 920 पर्यंत पोहोचली आहे.

किरकोळ गुन्ह्यात अटक

काही आरोपींना किरकोळ गुन्ह्यात अटक होते. सुरुवातीला सात अथवा चौदा दिवसांची पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आलेले आरोपी जामीन मिळविण्यास असमर्थ ठरतात. आर्थिक बाबींमुळे वकील देऊ शकत नाहीत. अथवा जामिनासाठी अर्जही करत नसल्याने वर्षानुवर्षे कारागृहात खितपत पडतात. 

कैद्यांना संसर्गजन्य आजार

क्षमतेपेक्षा कैद्यांची संख्या जास्त असल्याने, तेथील स्वच्छतेच्या अभावामुळे कैद्यांना संसर्गजन्य रोग होण्याचे प्रमाण वाढत आहे. तसेच एड्स, क्षयरोगाला कैदी लवकर बळी पडतात. क्षमतेपेक्षा कैद्यांची संख्या जास्त असल्याने सर्व कैद्यांची वैद्यकीय तपासणी करणे अशक्य आहे. त्यात डॉक्टरांची संख्याही कमी आहे.

कारागृहातील आरोपींची संख्या कमी करायची असेल, तर जामीन प्रक्रिया सुटसुटीत व्हावी. प्रकरणे तातडीने सुनावणीस घेण्याची गरज आहे. भादंवि  437, 438, 439 सारख्या कलमांमध्ये खून, चोरी, मारामारी आदी गुह्यांचा समावेश होतो. या प्रकरणामध्ये पोलीस तपास झाल्यानंतर आरोपीला जामीन देण्याची तरतूद करण्याची आवश्यकता आहे. हा जामीन देताना सराईत गुन्हेगार, अनेक खुनाचे आरोप असलेल्या आरोपींना जामीन नाकारून अन्य आरोपींना जामीन दिल्यास अथवा नाकारल्यास खटल्यावर काहीच परिणाम होऊ शकत नाही. त्यामुळे कच्च्या कैद्यांची कारागृहातील संख्या कमी होईल.

- अशोक मुंदरगी, ज्येष्ठ वकील

महाराष्ट्र कारागृह विभाग व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये अव्वल

पुणे : प्रतिनिधी

सात हजार तास वेबबेस व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे 77 हजार 624 कैद्यांना हजर करत महाराष्ट्र कारागृह विभागाने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे़  तर राजस्थानने 2 हजार तास 20 हजार कैदी वेबबेस व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करून दुसरा क्रमांक मिळविला आहे़ 

14 आणि 15 डिसेंबरदरम्यान जयपूर येथे सर्वोच्च न्यायालयाचे नियंत्रण असलेल्या कारागृह आणि न्यायालयादरम्यान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा वापर या विषयावरचे प्रशिक्षण पार पडले. त्यावेळी ई-कमिटी आणि आय.सी.चे प्रतिनिधी यांनी ही माहिती दिली. या प्रशिक्षणासाठी राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, गोवा, दीव आणि दमण, दादरा नगर हवेली ही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते़ 

राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक आणि कारागृह महानिरीक्षक डॉ़  भूषणकुमार उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील कारागृहात असलेल्या 77 हजार 624 कैद्यांना हजर करण्यात आले.

कारागृह विभागाद्वारे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा वापर तसेच कारागृहातील आजारी बंदींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी टेलिमेडिसिन सुविधा, मोफत कायदेविषयक सल्ला घेण्यासाठी टेलि लिगल एड, कारागृहात बंदिस्त असणार्‍या नातेवाइकांना भेटण्यासाठी टेलि मुलाखत, माहितीच्या अधिकारातील बंद्याच्या अपिलावरील सुनावणीसाठी राज्य माहिती आयुक्‍तांच्या समोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बंदींना हजर करणे, मुख्यालयातून प्रादेशिक विभाग प्रमुख आणि कारागृह अधीक्षक यांच्याशी बैठक घेणे, कारागृह अधिकारी व कर्मचारी यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन प्रशिक्षण देणे अशा विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली़  या प्रशिक्षणासाठी सांगली जिल्हा न्यायाधीश व्ही़   बी़   काकटकर, गोंदिया जिल्हा न्यायाधीश व्ही़  एस़  साठे, नाशिक जिल्हा न्यायाधीश जी़   पी़  देशमुख हे उपस्थित होते. महाराष्ट्रातील कारागृहातून मोठ्या प्रमाणावर व्ही़  सी़ द्वारे कैद्यांना हजर करण्यात येत असून यावेळी आवाज आणि व्हिडीओचा दर्जा अतिशय उत्तम असतो, असे अनुभव त्यांनी उपस्थितांना सांगितले़.