Tue, Apr 23, 2019 01:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › युतीसाठी पंतप्रधान करणार ठाकरेंशी चर्चा : रामदास आठवले

युतीसाठी पंतप्रधान करणार ठाकरेंशी चर्चा : रामदास आठवले

Published On: Jun 22 2018 2:42AM | Last Updated: Jun 22 2018 2:42AMठाणे : खास प्रतिनिधी

युती व्हावी म्हणून शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहेत, असा दावा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी ठाण्यातील पत्रकार परिषदेमध्ये केला.

आगामी लोकसभा निवडणूक ही एप्रिल महिन्यातच होईल, मध्यवर्ती निवडणुका होणार नाहीत, असे सांगून आठवले म्हणाले, स्वबळावर निवडणूक लढविली तर शिवसेनेचा मुख्यमंत्री बनणे अवघड आहे. पुन्हा 63 जागाही निवडून येणार नाहीत. उलट  युती केली तर मुख्यमंत्री बनण्याची उद्धव यांची मनीषा पूर्ण होऊ शकते. ज्या पक्षाच्या जास्त जागा निवडून येतील त्याचा मुख्यमंत्री अथवा अडीच -अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद या दोन फॉर्म्युल्यावर चर्चा होऊ शकते. त्यामुळे ठाकरेंनी युती तोडण्याची भाषा करू नये. भाजपलाही शिवसेनेची गरज असल्याने शिवसेनेची नाराजी तुम्ही दूर करावी, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्य केली आहे.  युतीबाबत ठाकरे यांच्याशी पंतप्रधान स्वतः चर्चा करणार असल्याचा दावा आठवले यांनी दावा केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधान मजबूत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगत आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासारखे काही लोक संविधान बदलण्याची भाषा करीत आहेत, या वक्तव्याची खिल्ली उडवली. 

मंत्रिमंडळाच्या विस्तारात आरपीआयला आणखी एक मंत्रीपद मिळाले पाहिजे तसेच महामंडळाच्या नियुक्त्यांमध्ये आरपीआय आठवले गटाला योग्य सन्मान मिळेल, असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला.