Wed, May 22, 2019 20:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पंतप्रधानांनी मुख्यमंत्रीही थेट निवडावा : ठाकरे

पंतप्रधानांनी मुख्यमंत्रीही थेट निवडावा : ठाकरे

Published On: May 18 2018 1:43AM | Last Updated: May 18 2018 1:43AMउल्हासनगर : वार्ताहर

कर्नाटकात राजकीय ‘कर नाटक’ चालू आहे. हे नाटक राज्यपालांच्या जिवावर चालू असून, राज्यपालांप्रमाणे मुख्यमंत्री हे देखील निवडणूक न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट नेमावेत, असा खोचक सल्ला देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील भाजप सरकारचा खास ठाकरी शैलीत समाचार घेतला. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगर येथील जनसंपर्क कार्यालयाचे आणि संकेतस्थळाचे उद्घाटन गुरुवारी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ठाकरे यांनी कर्नाटकमध्ये सत्तेसाठी सुरू असलेल्या रस्सीखेचाबद्दल भाजपावर टीकास्त्र सोडले. 

नागरिकांना का झुलवता?

उद्धव पुढे म्हणाले की, कर्नाटकात सत्ता बनवू शकता मग मंदिर वही बनायेंगे अशा घोषणा देऊन नागरिकांना का झुलवता? या फक्त राजकीय घोषणा आहेत. देशात सध्या कायद्याचा खेळ चालू असल्याची टीकाही त्यांनी केली. दरम्यान, भाजपचे नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातून फाईल चोरल्याचे प्रकरण उजेडात आले. यावरून भाजपवर निशाणा साधत फाईलचोर भाजपात आहेत, मग विकास कसा होईल? असा चिमटाही उद्धव यांनी काढला. तसेच उल्हासनगर शहराचा वादग्रस्त विकास आराखडाही जाळून टाकू, असा इशाराही त्यांनी दिला.

याप्रसंगी पालकमंत्री एकनाथ शिंदे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे, अंबरनाथ शहरप्रमुख अरविंद वाळेकर, नगराध्यक्ष मनीषा वाळेकर, बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे, महिला जिल्हा संपर्कप्रमुख संध्या वढावकर, जिल्हा संघटक लता पाटील, विजया पोटे आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.