Tue, Jul 07, 2020 22:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वाईट हेतूने काही करणार नाही

वाईट हेतूने काही करणार नाही

Published On: May 24 2019 2:37AM | Last Updated: May 24 2019 2:30AM
नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भाजप आघाडी सरकारला पूर्वीपेक्षाही जास्त बहुमत मिळाले याचे कारण या देशाला प्रामाणिक सरकार असावे अशी इच्छा बाळगणार्‍या जनतेचा हा विजय आहे. या निवडणुकीत कुठला पक्ष किंवा कुठला नेता विजयी झालेला नाही, तर भारत नावाचा देश आणि भारतीय लोकशाही विजयी झाली आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

दणदणीत बहुमत मिळाल्यानंतर प्रचंड जल्लोष सुरू असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झाले तेव्हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांचे तितक्याच जल्लोषात स्वागत केले. 

मोदी म्हणाले, प्रत्येक निवडणुकीत महागाईचा मुद्दा हटकून उभा राहात आला तोदेखील या निवडणुकीत नव्हता. ही निवडणूक कुणी एक पक्ष किंवा कुणी एक नेता लढवत नव्हता. तर भारतीय जनता लढत होती. महाभारताचे युद्ध संपले तेव्हा कृष्णाला विचारले गेले की तू कुणाच्या बाजूने आहेस? त्यावर कृष्ण म्हणाला, मी हस्तीनापूरच्या बाजूने! त्यानुसारच देशाचे लोकही भारतासाठीच उभे होते आणि त्यांनी भारतासाठीच मतदान केले. त्यामुळे आमचे सरकारही लोकांसाठीच काम करेल. वाईट हेतूने काहीही करणार नाही हा माझा शब्द आहे, अशी ग्वाहीदेखील मोदी यांनी दिली.