Sun, May 26, 2019 20:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › काँग्रेसची मानसिकता अजूनही आणीबाणीचीच !

काँग्रेसची मानसिकता अजूनही आणीबाणीचीच !

Published On: Jun 27 2018 2:12AM | Last Updated: Jun 27 2018 2:12AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

काँग्रेस आणि गांधी परिवार अजूनही आणीबाणीच्या मानसिकतेतून बाहेर पडलेला नाही. आपल्या मनासारखे होत नाही म्हणून काँग्रेसकडून  निवडणूक आयोग, न्यायपालिका आणि प्रशासन व्यवस्थेवर आघात केले जात आहेत. भाजप राज्यघटना आणि लोकशाहीसाठी कटिबद्ध आहे. लोकशाहीला खरा धोका हा काँग्रेसकडूनच आहे, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली.  

26 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. या घटनेला मंगळवारी 43 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त मुंबई भाजपच्या वतीने मरीनलाईन येथील बिर्ला मातोश्री सभागृहात आणीबाणीविरोधात लढणार्‍यांविषयी कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मोदी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. विशेष म्हणजे, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्यही या कार्यक्रमाला होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार उपस्थित होते. 

मोदी म्हणाले, जेव्हा काँग्रेस अडचणीत असते, तेव्हा समाजात राज्यघटनेला धोका असल्याची भीती निर्माण करण्याचे प्रयत्न केले जातात. सध्या  काँग्रेसचा असाच प्रयत्न सुरू आहे. मुस्लिम आणि दलितांमध्येही भीती निर्माण करण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. मात्र, देशाच्या राज्यघटनेला  भाजपकडून कोणताही धोका नाही. ज्या काँग्रेसने देशाच्या लोकशाहीच्या सुवर्ण इतिहासाला आणीबाणीचा काळा डाग लावला, त्या काँग्रेसकडूनच घटनेला  धोका आहे. आम्ही लोकशाही आणि घटनेबद्दल कटिबद्ध आहोत. काँग्रेस पक्षात अजिबात लोकशाही नाही. हा पक्ष एका परिवारासाठी चालविला जात आहे. आजही तीच परंपरा कायम आहे. काँग्रेसचा पराभव होत असल्याने ईव्हीएम मशिन आणि निवडणूक आयोगाबद्दलच संभ्रम निर्माण केला जात आहे. निवडणूक आयोग असो की न्यायपालिका, या व्यवस्थांवर आजवर कोणीही संशय व्यक्‍त केला नव्हता. मात्र, काँग्रेसने स्वत:च्या स्वार्थासाठी या व्यवस्थांवरही प्रहार केले. ईव्हीएम मशिनच्या नावाने खडे फोडणार्‍या काँग्रेसने कर्नाटकमध्ये मशिनमध्ये गडबड केल्याचा आरोप का केला नाही, असा सवाल त्यांनी केला.  काँग्रेसच्या खासदारांची संख्या 400 वरून 44 वर आल्यानेच ते निवडणूक आयोगाला टार्गेट करीत असल्याचा आरोप मोदी यांनी केला. 

गांधी परिवाराच्या भ्रष्टाचारप्रकरणी न्यायालयात खटला दाखल झाल्यानंतर त्यांनाही जामीन घ्यावा लागला. ही कारवाई हुकूमशाही मानसिकतेच्या काँग्रेसला पचनी पडली नाही. त्यामुळे न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा यांनाच हटविण्याचा ठराव काँग्रेसने संसदेत आणला. हा ठरावदेखील काँग्रेसच्या आणीबाणीच्या मानसिकतेचे धडधडीत उदाहरण आहे, असे मोदी म्हणाले. आणीबाणीवेळी काँग्रेसने संपूर्ण देशाचे रूपांतर तुरुंगात केले होते. इंग्रजांनी कधी वृत्तपत्रांवर बंदी आणली नाही, ती काँग्रेसने आणून दाखविली होती. त्यामुळे काँग्रेस सत्तेसाठी आणि गांधी परिवाराच्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते, अशी टीकाही त्यांनी केली. भाजपने संविधानदिन संसदेतच नव्हे, तर देशभर साजरा केला. संविधान हे केवळ नियमांचे पुस्तक नसून, देशवासीयांच्या आशा-आकांक्षाचे माध्यम आहे, असे सांगून त्यांनी  संविधान अमर रहे, असा नाराही  दिला. 

लोकशाही पराभूत करणार्‍यांचाच पराभव : मुख्यमंत्री 

काँग्रेसने देशात आणीबाणी लादली आणि लोकशाहीला पराभूत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर काँग्रेसचाच जनतेने पराभव केला. काँग्रेस आज संविधानाबाबत बोलत आहे. मात्र, संविधानावर सर्वाधिक आघात हे काँग्रेसनेच केले, असा हल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. ज्या राजर्षी शाहू महाराजांनी वंचितांना न्याय मिळवून दिला. त्यांच्या जन्मदिनीच काँग्रेसच्या उन्मत सत्तेने आणीबाणी लावली. देशाचे बंदिशाळेत रूपांतर करण्याचा प्रयत्न केला. त्याची फळे काँग्रेसला मिळाल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी आपल्या वडिलांना आणीबाणीत झालेल्या शिक्षेच्या आठवणीही जागविल्या.