Mon, Mar 25, 2019 02:56
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शासकीय प्रकल्प रोखणार्‍या येवलेंवर कारवाई का नाही?

शासकीय प्रकल्प रोखणार्‍या येवलेंवर कारवाई का नाही?

Published On: Apr 11 2018 1:41AM | Last Updated: Apr 11 2018 1:31AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

शासकीय कामात अडथळा आणणे हा गुन्हा ठरतो. एसआरए हा शासकीय प्रकल्प असतानाही हे रोखणारे संदीप येवलेसारखे कार्यकर्ते मोकाट राहतात. परिणामी, विक्रोळीच्या हनुमाननगरसारखा प्रकल्प पाच-दहा नव्हे तर तब्बल 22 वर्षे रखडतो. आमची पिढी एक तर बेघर किंवा संक्रमण शिबिरात राहते आहे. आमची पुढची पिढीही हक्‍काच्या घरापासून वंचित राहणार काय, असा सवाल हनुमाननगरातील रहिवाशांनी उपस्थित केला. येवले यांनी उडवलेल्या रकमेवर दै. पुढारीने मंगळवारच्या अंकात प्रकाश टाकताच त्याचे तीव्र पडसाद हनुमाननगरात उमटले. 

हनुमाननगर विकास फेडरेशन संघ ही रहिवाशांचे प्रतिनिधित्व करणारी मूळ संघटना. या संघटनेच्या संमतीनंतर एसआरए प्रकल्प वेगाने सुरू होण्याची चिन्हे असतानाच स्वयंविकास कार्यकर्ता संदीप येवले याने पार्कसाईट स्वयंविकास संघर्ष समिती स्थापन करून यात उडी घेतली आणि प्रकल्प रखडला. 

झोपडपट्टीला एसआरएची योजना आणि एलओची मंजुरी मिळाल्यानंतरही स्वत:ची पोळी भाजण्यासाठी  सामाजिक कार्यकर्ता म्हणून उदयास आलेल्या अशा प्रवृत्तीच्या लोकांनी योजनेस विरोध सुरू केला. यावर राज्य सरकारने कुठलाही हस्तक्षेप न केल्यास हीच काय, मुंबईतील कित्येक असे एसआरए प्रकल्प रखडू शकतात, अशी रहिवाशांची भावना आहे.   

वंदना नलावडे यांनी सांगितले की, हनुमाननगर झोपडपट्टीत मी 40 वर्षांपासून राहते. परंतु गेल्या 22 वर्षांपासून भिकार्‍यासारखी अवस्था झाली आहे. बिल्डर घरे देण्यासाठी प्रयत्नशील असताना, संदीप येवले आणि त्यांच्यासोबत असलेल्या लोकांमुळे आमचे पुनर्वसन रखडले आहे. अशा लोकांकडे दुर्लक्ष करून बिल्डरने आम्हाला लवकरात लवकर घरे द्यावी. 

हनुमाननगरच्या आदिनाथ सोसायटीत राहणार्‍या प्रेमिला मापणकर म्हणाल्या, गेल्या 11 वर्षापासून आम्ही ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहात आहोत. आमची घरे तोडून 22 वर्षे झाली. अद्यापही हक्काचे घर मिळालेले नाही. हिरानंदानी बिल्डरने एक चार मजली इमारत बांधून सोडली. तिच्यामध्ये कुणीही राहत नाहीत. तिचे कामही अर्धवट  झाले आहे. 

याच सोसायटीतील राजू मोहिते म्हणाले, दहा बाय दहाच्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये 22 वर्षापासून राहत आहे. आई, वडिल आणि मुलंबाळ घेवून याच जागेत जगतोय. आमची आता मरायची वेळ येवून ठेपली आणि अजूनही हक्‍काचे घर होण्याचा पत्ता नाही. आमचे आयुष्य सरले. आमच्या पुढच्या पिढीचे कसे होणार? सरकारनेच आता यात लक्ष घालावे आणि येवलेंसारख्या कार्यकर्त्यांचा बंदोबस्त करून प्रकल्प मार्गी लावावा. मनिषा जाधव म्हणाल्या, ट्रान्झिट कॅम्पमधील दुसर्‍या मजल्यावर एकूण 12 खोल्या आहेत. ओमकार बिल्डरने सर्व सुविधा दिल्या आहेत. परंतु हक्काचे घर कधी मिळेल, असा प्रश्‍न आहे.

जागृृती चौगुले यांनी सांगितले की, ट्रान्झिट कॅम्पमध्ये सर्व सुविधा आहेत. मात्र हक्काचे घर मिळेपर्यंत इथून कुठे जाता येत नाही. संदिप येवले यांने 5 ते 6 वर्षापासून येथिल पुनर्वसन प्रकल्पात उडी मारली आणि एसआरएच्या कामात अडचणी निर्माण केल्या.

गेल्या 11 वर्षापासून बेघर आहेत. बिल्डरने चांगला ट्रान्झिट कॅम्प बाधून दिला असला तरी पावसाळयात आमची प्रचंड गैरसोय होते. महत्त्वाचा प्रश्‍न हा आहे की आम्ही मरेपर्यत ट्रान्झिट कॅम्पमध्येच राहायचे का? संदिप येवलेसारख्या लोकांवर कारवाई करावी. त्याच्यामुळे आम्हाला वेठिस का धरण्यात येत आहे. ते कऴत नाही, असा उद्वेग वैशाली कदम यांनी व्यक्‍त केला.

हनुमाननगर झोपडपट्टीत रहिवाशांच्या नोंदणीकृत 15 सोसायट्या आहेत. यातील बहुतांश रहिवाशांची झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला संमती असताना ठराविक लोकांनी वाद निर्माण करून योजना रखडवली आणि त्याचे खापर मात्र विकासकावर फोडण्याचे कारस्थान रचले, असेही येथील चित्र आहे. येवलेंसारख्या स्वयंघोषित कार्यकर्त्यांच्या अर्थकारणात एकाच वेळी रहिवासी आणि विकासक अडकून पडतात आणि यात जणू आपली काहीच भूमिका नाही अशा थाटात एसआरए प्रशासन हा खेळ किती काळ बघत राहणार असाही प्रश्‍न आहे. 

Tags : mumbai, mumbai news, Sandeep Yevle, against,  Why not take action,