होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नोकर्‍या मागणारे नव्हे, देणारे बना 

नोकर्‍या मागणारे नव्हे, देणारे बना 

Published On: Jan 15 2018 1:39AM | Last Updated: Jan 15 2018 1:25AM

बुकमार्क करा
मुंबई : खास प्रतिनिधी

केवळ नोकरी मिळत नाही म्हणून स्वयंरोजगार करतो, अशी मानसिकता न ठेवता आणि नोकरी मागणारे न होता, उद्योग-व्यवसायातील छोट्या-मोठ्या संधींचा लाभ घेत नोकर्‍या देणारे बना, असा मंत्र राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद यांनी रविवारी दिला.

ठाणे जिल्ह्यातील उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये आर्थिक जनतंत्र परिषदेचे (इकॉनॉमिक डेमॉक्रसी कॉन्क्लेव्ह) उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. दलित व्हेंचर, मुद्रा, स्टार्टअप आदी सरकारच्या योजनांचा लाभ घेतलेले ठाणे, पालघर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांतील 200 यशस्वी उद्योजक या परिषदेत सहभागी झाले होते.

उद्यमशीलतेला प्रोत्साहन देणे ही केवळ सरकारची जबाबदारी नाही, तर खासगी व्यवसायाला सन्मान मिळेल अशी संस्कृती आणि वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी संस्था, उद्योग परिवार, खासगी बँका, स्वयंसेवी संस्था, माध्यमे यांचीही असून त्यांनी त्यासाठी हातभार लावावा, असे प्रतिपादन राष्ट्रपती कोविंद यांनी केले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सक्षमीकरण हा शब्द उच्चारायला सोपा आहे, मात्र प्रत्यक्षात कृतीत आणण्यासाठी खूप प्रयत्नांची गरज आहे. परंतु, पंतप्रधानांनी त्याची सुरुवात केली असून वंचित आणि दुर्बल घटकांनादेखील आर्थिक अधिकार मिळतील, अशा योजना आणल्या आहेत.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी यापूर्वी अनेकवेळा आल्याचे सांगताना प्रशिक्षणार्थी म्हणून मी स्व. प्रमोद महाजन यांच्याकडून तसेच विनय सहस्रबुद्धे यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे. या संस्थेच्या आवारात आज मी राष्ट्रपती म्हणून आलो तरी येथील अनेक आठवणी जाग्या झाल्या, अशा शब्दांत राष्ट्रपतींनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांच्या या विनम्र आणि साध्या सरळ निवेदनाने भारावलेल्या सभागृहाने टाळ्यांचा कडकडाट केला. या कार्यक्रमासाठी राष्ट्रपतींच्या पत्नी सविता, राज्यपाल डॉ. सी. विद्यासागर राव, केंद्रीय अर्थराज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला, दलित इंडियन चेम्बर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिजचे (डिक्‍की) अध्यक्ष मिलिंद कांबळे, ‘नाबार्ड’चे अध्यक्ष हर्ष कुमार हे उपस्थित होते.