होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अंगारकीसाठी सिद्धिविनायक सज्ज!

अंगारकीसाठी सिद्धिविनायक सज्ज!

Published On: Jul 28 2018 1:35AM | Last Updated: Jul 28 2018 1:31AMमुंबई ः प्रतिनिधी

मुंबईकरांचे आराध्य दैवत प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात येत्या अंगारकी संकष्टीनिमित्त जय्यत तयारी केली असून दर्शनासाठी येणार्‍या भाविकांसाठी मंदिर प्रशासनाने विशेष तयारी केली आहे. सोमवारी मध्यरात्री 1.30 पासून दर्शनाला सुरुवात केली जाणार आहे. 

अंगारक संकष्ट योग 3 एप्रिलनंतर आता पुन्हा यावर्षातील अंगारकी मंगळवारी येत आहे. अंगारकीच्या निमित्ताने मुंबईसह मुंबईबाहेरील दर्शनासाठी लाखो भाविक येतात. भाविकांना दर्शन सुकर व्हावे म्हणून महिला आणि पुरुष भाविकांसाठी अंगारकी निमित्त विशेष दोन प्रवेशद्वारांची तसेच मंडपाची उभारणी केली जात आहे. महिला आणि पुरुष भाविकांना स्वतंत्र रांगेतून दर्शन मिळणार असल्याचे न्यासाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव पाटील यांनी माहिती देताना सांगितले.

अंगारकी संकष्टीनिमित्त लाखो भाविकांची गर्दी असते. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच भाविकांना सुकर दर्शन व्हावे यासाठी पोलीस आणि मंदिर न्यास प्रशासनाबरोबर मंदिर न्यासाचे सेवेकरी आणि  स्वयंसेवी संस्थांचे कर्मचारी काम करणार आहेत. मंगळवारी भाविकांची गर्दी लक्षात घेता इलेक्ट्रॉनिक वस्तू, मौल्यवान वस्तू, पर्स, पूजा साहित्य आणू नये असे आवाहनही न्यासाने केले आहे. भाविकांच्या सोयीसाठी मंगळवारी सकाळपासून सिद्धिविनायक मंदिर ते कबुतर खाना दादर स्टेशन, केशवसुत पुलापर्यंत बसेसचीही सोय असणार आहे. 

भाविकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेर्‍यांबरोबर स्कॅनर, वॉकी टॉकी यंत्रणा,अग्निशमन यंत्रणाही कार्यरत असणार आहे. मंदिरात प्रवेश करण्याआधी भाविकांची कडक तपासणी पोलिसांमार्फत करण्यात येणार असल्याची माहिती न्यास प्रशासनाने दिली.

महिला भाविकांसाठी रांग

आयडीबीआय बँक, शंकर घाणेकर मार्गावरुन ते रिद्धि प्रवेशद्वार चेक पोस्ट या दरम्यान उभारण्यात आलेल्या रेलिंगमधून भाविकांनी सोमवारी मध्यरात्री 1.30 पासून प्रवेशद्वार 6 मधून प्रवेश दिला जाणार आहे. महिला भाविकांसाठी कॉन्व्हेंट हायस्कूल कॉर्नर तसेच आयडीबीआय बँक, शंकर घाणेकर मार्ग येथे चप्पल स्टॅन्डची व्यवस्था केली जाणार आहे.

पुरुष भाविकांसाठी रांग व्यवस्था

रवींद्र नाट्यमंदिर कलांगण येथील मंडप साने गुरुजी प्रवेद्वारामार्गे या दरम्यान उभारण्यात आलेल्या रेलिंगमधून भाविकांना सोमवार 30 जुलै 2018 रोजी मध्यरात्र 1.30 वाजल्यापासून मंदिर प्रवेशद्वार क्रमांक 4 मधून प्रवेश दिला जाईल. पुरुष भाविकांसाठी रवींद्र नाट्यमंदिर प्रवेशद्वार 1 व 2 च्या मध्ये तसेच जयभारत हॉटेल, शंकर घाणेकर मार्ग येथे चप्पल स्टॅण्डची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 

इथून दुरुन दर्शनासाठी सोय...

एस. के. बोले मार्गावरील आगर बाजार ते सिद्धी प्रवेशद्वार या दरम्यान उभारण्यात आलेल्या रेलिंगमधून भाविकांना मंदिर प्रवेशद्वार क्रमांक 1 मधून आलेल्या भाविकांना दुरुन दर्शनासाठी सोय केली जाणार आहे.