Wed, Jul 24, 2019 08:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › माटुंग्यात गरोदर महिलेची गळा दाबून हत्या

धक्कादायक; गरोदर महिलेची गळा दाबून हत्या

Published On: Mar 09 2018 2:06AM | Last Updated: Mar 09 2018 2:06AMधारावी : वार्ताहर

जागतिक महिला दिनाचा सर्वत्र उत्साह  असताना बबिता राजेश बोडा (23) या गरोदर महिलेची तिच्याच सासरच्या मंडळींनी गळा दाबून हत्या केल्याची खळबळजनक घटना माटुंगा लेबर कॅम्पमध्ये गुरुवारी घडली. शाहुनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पती, सासरा, नणंदेला अटक केली आहे.

बबिता ही चार महिन्यांची गरोदर असल्याचे तिच्या आईने सांगितले. या प्रकरणी शाहूनगर पोलीस ठाण्यात दुहेरी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला  आहे. पती राजेश सिद्धराम बोडा (27), सासरा सिद्धराम रामचंद्र बोडा (65), नणंद सुलोचना धनराज बटकेरी (32) यांना पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर भादंवि. 302, 304 (ब), 34 अन्वये कारवाई केली.

माटुंगा लेबर कॅम्प परिसरात राहणार्‍या राजेशचे बबिताशी प्रेमसंबंध होते. नऊ महिन्यांपूर्वी प्रेमाचे रूपांतर लग्नात झाले. लग्नात हुंडा न मिळाल्याने राजेशच्या घरची मंडळी नाराज होती. राजेश घरात एकटाच कमावता असल्याने त्याच्यावर संपूर्ण परिवाराचा भार होता. 

त्यातच परिवारात आणखीन एकाची वाढ झाल्याने सासरा सिद्धराम, नणंद सुलोचना यांचा राग अनावर झाला होता.  बबिताला घरातून हाकलवण्याचा डाव त्यांनी आखला. घरखर्चामुळे घरात भांडणे होत असल्याचे पाहून तिने गरोदर असताना एका डिजिटल बोर्ड बनवणार्‍या कारखान्यात नोकरी पत्करली.  तिने घरच्यांचा विश्वास जिंकण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, पैशाच्या हव्यासापोटी सासरा, नणंदेने तिला कधीच आपलेसे केले नाही. 

बुधवारी रात्री यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झाल होतेे. पहाटेच्या साखर झोपेत असताना पती, सासरा व नणंदेने तिचा गळा दाबून खून केला. सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करुन चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याचे कारण सांगितले.

तिच्या गळ्यावरील निशाणांमुळे हत्या झाल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर शाहूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप थोरात, पोलीस निरीक्षक बाळू चव्हाण यांनी रुग्णालयातून सासरच्यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता गळा दाबून हत्या झाल्याचे तपासात उघड झाले.