Mon, Aug 19, 2019 11:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भीमा कोरेगावची घटना पूर्वनियोजित!

भीमा कोरेगावची घटना पूर्वनियोजित!

Published On: Jan 02 2018 1:50AM | Last Updated: Jan 02 2018 1:33AM

बुकमार्क करा
मुंबई : विशेष प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील भिमा-कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आंबेडकरी अनुयायांवर केलेला हल्ला हा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.  या हल्ल्याची न्यायालयीन चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी या पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे यांनी केली आहे. 

भिमा कोरेगाव शौर्य लढ्याला यंदा 200 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे यावर्षी लाखोंच्या संख्येने लोक या ठिकाणी येणार आहेत याची पूर्ण कल्पना सरकारला होती. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात काही लोकांकडून तणाव निर्माण करण्याचे काम सुरू होते. भिमा कोरेगावचे वातावरण तणावपूर्ण असताना सरकारने चोख पोलीस बंदोबस्त व सुरक्षा न पुरविल्यामुळे ही घटना घडली, असा आरोप डॉ. वाघमारे यांनी केला.

पोलिसांसमोरच दंगेखोराकडून वाहनांची तोडफोड करीत आंबेडकरी महिला, मुले व ज्येष्ठ नागरिकांना मारहाण करण्यात आली. याबाबत पोलीस महासंचालकांना कायदा सुव्यवस्था  यांनी फोन करूनदेखील त्यांनी मिटिंगमध्ये असल्याचे कारण सांगत फोन घेतला नाही. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांची भूमिका संशयाची होती. घटना घडून गेल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचल्याचे वाघमारे म्हणाले. 

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आरोपींच्या अटकेची मागणी केली आहे. दलित मराठा संघर्ष पेटविण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न असून हे षडयंत्र रोखण्यासाठी मराठा आणि दलित बांधवांनी संयम ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. भीम अनुयायांवर हल्ला होत असल्याचे कळताच आठवले यांनी पुणे जिल्हा अधिकार्‍यांशी संपर्क साधून आंबेडकरी अनुयायांच्या संरक्षणासाठी पोलिसांची कुमक पाठविण्याचे निर्देश दिले. बुद्धिस्ट फेडरेशनचे राजरत्न डोंगरगावकर, मानस भोसले व प्रणित कांबळे  यांनीही हा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप केला आहे.