Thu, Feb 21, 2019 08:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राम कदमांमुळे परिचारक यांचा निर्णय लांबणीवर

राम कदमांमुळे परिचारक यांचा निर्णय लांबणीवर

Published On: Sep 06 2018 1:41AM | Last Updated: Sep 06 2018 1:41AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

आमदार राम कदम यांनी मुलींना पळवून आणण्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सैनिकांच्या पत्नीविषयी बेताल वक्तव्य करणार्‍या भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांच्या वेतनाचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे. त्यांच्या वेतनावर निर्णय घेण्यासंदर्भात विधिमंडळात बुधवारी आयोजित करण्यात आलेली बैठक राम कदम यांच्या प्रकरणानंतर पुढे ढकलण्यात आली.

प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नीबद्दल राम कदम यांच्याप्रमाणेच मुक्ताफळे उधळली होती. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेने विधिमंडळ आणि विधिमंडळाबाहेर आक्रमक पवित्रा घेत परिचारक यांना निलंबित करण्यास  भाजपला भाग पाडले. त्यांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णयही हाणून पाडण्यात आला. मात्र, निलंबन काळातील परिचारक यांचे वेतन आणि आमदार निधी त्यांना द्यायचा की नाही यावर निर्णय घेण्यासाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली विधान 

भवनात गटनेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, राम कदम यांच्या वक्तव्यावरून राज्यातील वातावरण तापल्याने ही बैठक रद्द करण्यात आली. कदम आणि परिचारक हेच अडचणीत आलेले नाहीत. यापूर्वी प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, अन्न व नागरीपुरवठा मंत्री गिरीष बापट, आमदार राज पुरोहित, खासदार शरद बनसोडे, पुण्याच्या महापौर मुक्ता टीळक, अहमदनगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम आदी भाजप नेत्यांनाही टीकेचे धनी व्हावे लागले आहे.