Mon, Mar 25, 2019 05:34
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आमदार परिचारकांना विधिमंडळात नो एंट्री

आमदार परिचारकांना विधिमंडळात नो एंट्री

Published On: Mar 07 2018 2:08AM | Last Updated: Mar 07 2018 2:03AMमुंबई : प्रतिनिधी

देशाच्या सीमेवर लढणार्‍या जवानांच्या कुटुंबीयांचा अवमान करणार्‍या आमदार प्रशांत परिचारक यांना बडतर्फ करण्यात यावे, असा प्रस्ताव शिवसेना गटनेते अ‍ॅड. अनिल परब यांनी विधान परिषदेत मांडला आहे. या प्रस्तावावर निर्णय होईपर्यंत परिचारक यांना विधिमंडळ सभागृहात येण्यास मनाई करण्याचे निर्देश सभापती रामराजे निंबाळकर यांनी मंगळवारी दिले. संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी सभागृहात झालेला निर्णय मान्य असल्याचे सांगत त्यानुसार कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले. 

विधान परिषद सभागृहाचे कामकाज सुरू होताच शिवसेनेच्या अनिल परब यांनी जवानांच्या कुटुंबियांबात आमदार परिचारक यांनी केलेले वक्तव्य हे एक प्रकारे देशद्रोही कृत्य आहे. त्यामुळे त्यांना या सभागृहातून बडतर्फ करण्यात यावे. विधानमंडळाच्या या पवित्र सभागृहात त्यांना पाय ठेवू देऊ नका, अशी मागणी करत परिचारकांच्या निलंबनाचा मुद्दा लावून धरला. 

परिचारकांच्या बडतर्फीच्या प्रस्तावावर सभागृहात चर्चा करून प्रत्येक सदस्याला आपले मत मांडण्याची परवानगी द्या. कुणाला जवानांबद्दल प्रेम नाही आणि परिचारकांबद्दल प्रेम आहे हे एकदाचे समजू द्या. या प्रस्तावावर निर्णय होत नाही तोपर्यंत त्यांना सभागृहात येण्यास परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी परब यांनी केली. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी देखील या मागणीला पाठिंबा दिला.

काँग्रेस सदस्य भाई जगताप, राष्ट्रवादीचे हेमंत टकले, जयंत जाधव यांनी लवकरात लवकर यासंदर्भात निर्णय व्हावा, अशी मागणी केली. त्यावर सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी परिचारक यांचे निलंबन मागे घेण्याच्या प्रस्तावाला नियमानुसार स्थगिती देता येत नसल्याचे स्पष्ट केले. बडतर्फीसंंदर्भातील प्रस्ताव तपासून निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. सभागृहातील एकंदर भावना लक्षात घेता, बडतर्फीच्या प्रस्तावावर निर्णय होईपर्यंत त्यांना सभागृहात उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात येऊ नये असे निर्देश त्यांनी सरकारला दिले. संसदीय कार्यमंत्री बापट यांनी देखील ते मान्य केले. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी यासंदर्भातील निर्णय होईपर्यंत वेतन आणि भत्ते त्यांना देण्यात येऊ नये, अशी सूचना केली.