Mon, May 20, 2019 22:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › काँग्रेस नेत्यांवर आमदार लाड यांचा 500 कोटींचा दावा

काँग्रेस नेत्यांवर लाड यांचा 500 कोटींचा दावा

Published On: Jul 05 2018 1:39AM | Last Updated: Jul 05 2018 9:03AMमुंबई : वृत्तसंस्था

नवी मुंबई येथील सिडकोची जमीन विक्री व्यवहारात आमदार प्रसाद लाड यांचा संबंध असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन केला होता. या जमिनीच्या खरेदी- विक्रीशी काहीही संबंध नसताना निव्वळ राजकीय हेतूने प्रेरित होऊन बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपा आमदार लाड यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वाराज चव्हाण, काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांच्यावर  500 कोटींचा अब्रूूनुकसानीचा दावा दाखल करण्याची नोटीस पाठवली आहे.  नवी मुंबई विमानतळाजवळील 24 एकरचा भूखंड अवघ्या 3 कोटी 60 लाख रुपयांत आमदार लाड यांच्या निकटवर्तीय बिल्डरला दिल्याचा खोटा आरोप काँग्रेस नेत्यांच्या पत्रकार परिषदेत करण्यात आला.

तसेच हा भूखंड सध्याच्या बाजारभावानुसार तब्बल 1600 कोटींचा असल्याचा कपोलकल्पित दावा करण्यात आला होता. मुळात हा आरोप करताना कोणताही आधार किंवा पुरावे नसताना केवळ खोट्या माहितीच्या आधारावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर तसेच गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले होते. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात लवकरच  दाद मागण्यात येणार असून त्याची कायदेशीर नोटीस संबंधितांना स्पीड पोस्टद्वारे पाठविण्यात आल्याची माहिती लाड यांनी दिली. मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढले हा घोटाळा केल्याचा पुरावा असू शकत नाही.

माझी अनेक नेत्यांशी आणि व्यावसायिकांशी मैत्री आहे, याचा अर्थ मी त्यांच्या व्यवसायात भागिदार आहे असा होत नाही. काँग्रेस नेत्यांनी खोटेनाटे आरोप करून आपल्या वैयक्तिक तसेच सरकारच्या प्रतिमेला धक्का देण्याचाही हा प्रयत्न केला आहे. त्यामुळे नाइलाजास्तव संबंधितांच्या विरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. या दाव्याबाबत काँग्रेस नेत्यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे, ही नोटीस मिळाल्यापासून तीन दिवसांच्या आत त्याबाबतचा खुलासा करावा. किंवा 2 जुलैच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्ये आणि आरोप बिनशर्त मागे घेऊन माफी मागावी, अन्यथा पुढील कायदेशीर प्रक्रियेला काँग्रेस नेत्यांना सामोरे जावे लागेल असे त्यांनी म्हटले आहे.