Wed, Jul 24, 2019 05:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मंत्रिमंडळात प्रकाश मेहता कायम?

मंत्रिमंडळात प्रकाश मेहता कायम?

Published On: Apr 11 2018 1:41AM | Last Updated: Apr 11 2018 1:04AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार चालू महिन्यातच केला जाणार असून, घोटाळ्याचे आरोप असलेले गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याऐवजी त्यांचे खाते बदलले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय भाजपच्या तीन ते चार नव्या चेहर्‍यांना संधी दिली जाणार असल्याचे समजते.

भाजपचा महामेळावा नुकताच पार पडला असून, या महामेळाव्यातून भाजपने लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा प्रारंभ केला आहे. निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करून काही नव्या चेहर्‍यांना संधी देतानाच काही मंत्र्यांच्या खात्यात बदलही केला जाणार असल्याचे समजते. गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्यावर एसआरए प्रकल्पात विकसकाला लाभ देणारा निर्णय घेतल्याचा आरोप आहे. त्यांचा हा घोटाळा गाजल्यानंतर या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

मेहता हे भाजपचे पक्षातील ज्येष्ठ नेते असून, त्यांचे दिल्लीतही चांगले वजन आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळातून हटविण्याचा निर्णय होणे कठीण आहे. त्यावर पर्याय म्हणून त्यांचे गृहनिर्माण खाते बदलले जाऊ शकते.

विष्णू सवरांना हटवणार?

आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांचीही मंत्रिमंडळातून उचलबांगडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांची आतापर्यंतची कारकीर्द निष्प्रभ ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. 

मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांचे नाव मंत्रिमंडळात आघाडीवर आहे. मुंबई महापालिकेत पक्षाला मिळालेल्या यशाची पोचपावती म्हणून शेलार यांचा समावेश निश्‍चित मानला जात आहे. मुंबईतून आमदार योगेश सागर यांचेही नाव चर्चेत आहे. घटक पक्षातून आमदार विनायक मेटे, याशिवाय पश्‍चिम महाराष्ट्रात पक्षाला ताकद देण्यासाठी शिवाजीराव नाईक किंवा सुरेश खाडे यांच्यापैकी एकाला संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

Tags : mumbai, mumbai news, Prakash Mehta, continued, Cabinet,